तिरोडा : शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य हमीभाव मिळावा यासाठी शासनाकडून हमीभाव जाहीर केला जातो. धानाच्या आधारभूत किमती १८६८ ते १८८० रुपये आधारभूत किमत जाहीर केली आहे. पण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने धान खरेदी करीत आहेत; मात्र याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शासकीय धान खरेदी केंद्राचा घोळ कायम असल्याने अनेक शेतकरी गरजेपोटी खासगी व्यापारी आणि कृषी बाजार समितीत धानाची विक्री करीत आहेत. नियमाप्रमाणे १८६० व १८८० या आधारभूत किमतीमध्ये धान खरेदी करणे बंधनकारक आहे; मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात व्यापारी शेतकऱ्यांचे धान १२५० ते १३५० रुपये प्रतिक्विंटल या दराने धान खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप केला. हा सर्व प्रकार कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या डोळ्यासमोर सुरु असून याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आधारभूत किमतीपेक्षा कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.