दिन विशेष
विजय मानकर
सालेकसा : भारतीय संस्कृतीत गुरूपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असून दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साह व श्रद्धेने साजरा केला जातो. आपल्या देशात सर्वत्र वेगवेगळ्या स्वरुपात आपल्या गुरुच्या प्रती श्रद्ध व्यक्त करीत या दिवशी गुरुपौर्णिमा सण साजरा केला जात असून विदेशात सुद्धा या दिवशी भारतीय वंशातील लोक हा सण साजरा करतात. तालुक्यात वाघ नदीच्या काठावर तिरखेडी गावाजवळ महात्यागी सेवा संस्थान पोंगेझरा आश्रमात मागील २४ वर्षांपासून गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा कायम आहे.
महात्यागी सेवा संस्थान पोंगेझरा आश्रमाचे संस्थापक संत ज्ञानीदास महाराज यांनी २३ वर्षांपूर्वी तालुक्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी वाघनदीच्या काठावर एका वाहत्या झऱ्याजवळ आपले बस्तान मांडले आणि येथील शिवालयाचा जीर्णोद्धार करून निसर्गाच्या सानिध्यात आपल्या अनुयायी शिष्यांना ब्रम्हज्ञान देण्यास सुरुवात केली. सोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आध्यात्मिक गुरूचे स्मरण करीत गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रारंभ केला. यंदा गुरुपौर्णिमेची परंपरा २४ व्या वर्षात पदार्पण करीत असून कोविडमुळे उत्सवात भाविकांची गर्दी राहणार नसली तर ज्ञानीदास महाराजांच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमेचा सण कोविड नियमांचे पालन करून परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्णय घेतला. यंदा २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून धार्मिक रितीनुसार पूजन व अखंड रामायण पाठ सुरू करण्यात येईल. २४ तास सतत रामायण पाठ केल्यानंतर २४ जुुलै रोजी गुरू चरणपादुका पूजन, गुरुपूजन, वैदिक ब्राम्हणाद्वारे पादुकाभिषेक केले जाईल व रामायण पाठ समापन करीत, महाप्रसाद देऊन कार्यक्रम पार पाडला जाईल. ही परंपरा अशीच वर्षानुवर्षे अखंडित राहावी यासाठी आवाहन केले जाईल.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व
असे मानले जाते की, महाभारत या महाकाव्याचे रचयेता महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढी पौर्णिमेच्या दिवशी झाला असून ते आद्य गुरू मानले जातात. हिंदू धर्मामध्ये एकूण सहा शास्त्रे आणि १८ पुराणे असून या सर्व ग्रंथांची रचना सुध्दा महर्षी व्यास यांनी केली. त्यांनी सर्वप्रथम ज्ञानोपदेश देण्याला सुरुवात केला म्हणून त्यांची जयंती सर्वत्र ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सकाळी उठून पवित्र स्नान करून साक्षात गुरूचे चरणस्पर्श करून त्यांच्या प्रती श्रद्धा भाव व्यक्त केल्यास, गुरू हयात नसतील तर त्यांच्या छायाचित्रासमोर श्रध्दाभावाने पूजन केल्यास, प्राप्त केलेले ज्ञान सार्थक ठरते.
---------------------
‘गुरूचा महिमा चिरकाळ प्रत्येक जनात कायम राहावा म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा चालली आहे. गुरूची सत्ता ईश्वरीय सत्तेचे अंश असून ईश्वरीय सत्ता विश्व व्यवस्था बनविते. तर गुरूसत्ता त्या व्यवस्थेचे अनुशासन शिकविते. अशात गुरूचा महिमा सर्वसामान्यांना अनुभवता यावा, यासाठी गुरूपूजेची परंपरा अखंडित चालली आहे.
-संत ज्ञानीदास महाराज
पोगेंझरा आश्रम तिरखेडी