लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेती कामाचा हंगाम संपल्यानंतर ग्रामीण नागरिकांच्या हाताला कामे नसतात. अशा परिस्थितीत वनोपजावर आधारीत कामातून त्यांना तात्पुरता रोजगार उपलब्ध व्हायचा. मोह व पळस वृक्षांच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करणे हे एक प्रमुख काम होते. परंतु, प्लास्टीकने केलेले अतिक्रमण, अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांमुळे वनखात्याने लादलेले निर्बंध यामुळे हा व्यवसाय हिरावल्या गेला आहे. त्यांना रोजगारासाठी इतरत्र स्थानांतरण करण्याची वेळ आली आहे.उन्हाळ्यात तेंदू पत्याची पाने गोळा करणे, मोहफुलांचे संकलन, मोह- पळसाची पाने यापासून पत्रावळी तयार करणे, जंगलात जाऊन रानमेवा गोळा करणे या माध्यमातून खेड्यापाड्यातील नागरिकांना उन्हाळ्यात रोजगार मिळत होता. परंतु ही परिस्थिती सध्या पूर्णपणे बदलली आहे. उन्हाळ्यात जंगलालगत वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले हे सुद्धा यासाठी कारणीभूत ठरले आहेत. गोंदिया तालुका विपुल वनसंपदेने समृद्ध आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पानांपासून पत्रावळी तयार करण्याचा व्यवसाय करीत होते. संपर्ण कुटूंब या कामात असल्याने त्यातून त्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत होते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे.पूर्वी खेड्यापाड्यात विवाह, सप्ताह व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात मोह व पळसाच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनवले जात. या पत्रावळीत केलेले जेवण लोकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत यंत्राद्वारे प्लास्टिकच्या पत्रावळी व द्रोण बनवले जावू लागले.किंमतीने कमी आणि वापरण्यास सोपी असलेली प्लास्टीक पत्रावळ सहज उपलब्ध होऊ लागली. विविध रंगात आकर्षक दिसणाºया या पत्रावळी प्लास्टिक सोबतच थर्माकोल व कागदी स्वरुपातही उपलब्ध होऊ लागल्याने, त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली.बंदीतही विक्री सुरुचपानांपासून तयार केलेल्या पत्रावळी पर्यावरणपूरक व आरोग्यदायी आहेत. विशेष म्हणजे, या पत्रावळींचे विघटन होत असल्याने त्यांचा खत म्हणून वापर करता येतो. परंतु, प्लास्टीक पत्रावळींमुळे ही परिस्थिती बदलली. प्लास्टीकचा वापर वाढल्याने प्रदूषणाची समस्याही वाढली. त्या अनुषंगाने शासनाने राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घातली. त्यामुळे पारंपारीक पद्धतीने पळस व मोहाच्या पानांपासून बनविणाऱ्यांचे पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. आजही प्लास्टिक पत्रावळी व द्रोणाचा वापर व विक्री सुरु आहे.
वनसंपदेचा ऱ्हासग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्यात शेतीची कामे नसल्याने घर बसल्या पळस व मोहाच्या पानांपासून पत्रावळी बनविण्याचे काम करीत होते. पूर्वी सगळीकडे वनसंपदा मुबलक प्रमाणात असल्यामुळे झाडाच्या पानांची कमतरता भासत नव्हती. परंतु जंगलातील अवैध वृक्षतोड वाढली. पळसाच्या वृक्षांची विविध कारणांसाठी नेहमीच कत्तल केली जाते. त्यामुळे पानाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला. आता फक्त अक्षयतृतीया, पोळा, श्राद्ध व धार्मिक प्रयोजनाप्रसंगी हिरव्या पत्रावळी विक्रीसाठी आणल्या जातात.