तिरोडा : तुमसर-तिरोडा-गोंदिया या राज्य मार्गाचे काम सुरू असून, तिरोडा शहरातून हा राज्य मार्ग तयार करीत असताना रस्ता बनविण्याचे काम असणाऱ्या बार्बरीक कन्स्ट्रक्शनचे अधिकारी वाहतूक व्यवस्था अडचणीत आणण्याचे काम करीत असल्याचा तिरोडा शहरवासीयांनी केला आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. सहकारनगर, रामनगर येथील रहिवासीयांना तिरोडा शहरात जायचे असेल तर गोंदियानाका किंवा बसस्थानकावर जावे लागते. १०० मीटर अंतरासाठी एक किमी अंतराचा फेरा मारून जावे लागते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी अपघातांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. राज्य मार्गाचे काम करीत असताना मधात रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज होती. मात्र तसे न केल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी संबंधित कंपनीने पर्यायी रस्ता तयार करून देण्याची मागणी रामनगर, सहकारनगर येथील नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या खोदकामामुळे कित्येक दिवसांपासून कित्येक भागात पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे हा प्रश्न त्वरित मार्गी न लावल्यास या विराेधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासीयांनी दिला आहे.