गोंदिया : मोठ्या आवाजात गाणे वाजविणे, डिजे, फटाके आदींमुळे ध्वनी प्रदूषण होत असून, त्याचा कानांवरही परिणाम होतो. यामुळेच न्यायालयाने डिजे, फटाके आदींसाठी काही नियम ठरवून दिले आहेत. मात्र, असे असतानाच आपल्या हौसेखातर वाहनांमध्ये चित्रविचित्र आवाजाचे कर्णकर्कश हॉर्न लावणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे. भरधाव वेगात वाहन घेऊन जाताना हे कर्णकर्कश हॉर्न वाजवून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी हा प्रकार केला जातो. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार तरुणांकडून जास्त प्रमाणात केला जातो. याशिवाय, बुलेटच्या सायलेंसरला सेट करून त्यातून फटाके फोडण्याचा प्रकारही सध्या चांगलाच चालत आहे. मात्र, अशांवर आता वाहतूक नियंत्रण शाखेची नजर असून ४२ वाहनांवर कारवाई करून ८४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
-----------------------------------
फॅन्सी हॉर्नची झाली फॅशन
सध्या तरुणांमध्ये रेसिंग बाईक्स व बुलेटची क्रेझ दिसून येत आहे. त्यातही वाहनांमध्ये आपल्या पसंतीचे उंच आवाजाचे फॅन्सी हॉर्न लावून गर्दीच्या ठिकाणी वाजवून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गर्दीच्या ठिकाणातून भरधाव वेगात वाहन चालवित असले हॉर्न वाजविणे ही एक फॅशन झाली आहे. मात्र, हा प्रकार नियमाविरोधात असून, आरोग्याला हानिकारक आहे. आपली बाईक व आपली स्टाईल इतरांहून वेगळी कशी दाखवायची, यासाठी तरुणांची धडपड असते.
--------------------------
कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर...
कर्णकर्कश हॉर्न वाजविल्यास अशांवर कलम १७७अंतर्गत कारवाई करण्याची वाहतूक अधिनियमात तरतूद आहे. मात्र, आतापर्यंत अशांकडे वाहतूक नियंत्रण शाखाही दुर्लक्ष करीत होती. मात्र, तरुणांची ही फॅशन वाढतच चालली असून, त्यापासून इतरांना त्रास होत असल्याने आता वाहतूक नियंत्रण शाखेची नजर अशा कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर आहे. यातूनच वाहतूक नियंत्रण शाखेने या वर्षात ४२ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
--------------------------------
कोट
कर्णकर्कश हॉर्न आपल्या बाईकमध्ये लावून गर्दीच्या ठिकाणी ते वाजविणे एक फॅशन झाली असून, यात तरूण जास्त प्रमाणात आहेत. मात्र, आपल्या हौशीमुळे इतरांना त्याचा त्रास होत असल्याचे ते विसरून जातात. यामुळेच आता वाहतूक नियंत्रण शाखेने अशांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. भरधाव वेगात वाहन चालविणे तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेची नजर आहे.
- दिनेश तायडे
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया.
-------------------------
सन सिग्नल तोडला नो पार्कींग हेल्मेट नाही कर्णकर्कश हॉर्न
२०२० ०७ १८५ ६७ ००
२०२१ १२२ ६९ १६ ४२