लाखोंचा महसूल बुडाला : अधिकारी-कर्मचाऱ्यांशी साटेलोटेसडक-अर्जुनी : जिल्ह्यात गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या सडक-अर्जुनी तालुक्यात खुलेआम रेतीची चोरी केली जात आहे. रेती तस्करांवर कोणतेही बंधन नसल्यामुळे महसूल विभागाने रेती चोरीसाठी मूक संमती तर दिली नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अवैध रेती चोरीसाठी दंडरूपाने जमा होणारी रक्कम सरकारी तिजोरीत जमा होण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खर्च केली जात आहे.सडक-अर्जुनी तालुक्यात १० ते १२ रेतीघाट असून यावर्षी रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले नाही. मात्र रेतीघाटावरुन राजरोसपणे रेतीची वाहतूक सुरु आहे. बोचली व मसवानी घाटावरुन पहाटे ३ वाजेपासून तर ७ वाजेपर्यंत सर्रास रेती वाहतूक करण्यात येते. त्यामुळे ट्रॅक्टरच्या आवाजाने नागरिकांची झोपमोड होत असल्यांची नागरिकांनी तक्रार आहे. चांगल्या रेतीसाठी प्रसिद्ध असलेला घाटबोरी (तेली)चा रेतीघाट लिलावापुर्वीच रिकामा होत आहे. अनेक नागरिकांनी तहसील कार्यालयात तक्रारी दाखल केल्या, परंतु अवैध रेतीवाहतूक करणाऱ्यांचे महसूल विभागाशी असलेले संबंध चोरांनाच साथ देणारे दिसून येत आहे. त्यामुळे कारवाई शून्यच आहे.मौजा राका येथील साजा क्र.६ मधील रेती चोरी करुन ३५ ब्रास रेती गावकऱ्यांच्या घराजवळ कंत्राटदारांनी अवैधरित्या साठवून ठेवली. त्या संदर्भात माहिती अधिकारांतर्गत माजी सरपंच मधुकर मेंढे यांनी माहिती मागितली असता ओम काशिवार व लिलाधर काशिवार रा.नवेगावबांध यांनी रेती साठवून ठेवल्याचे लक्षात आले. त्यावरुन त्या ३५ ब्रास रेतीचा तलाठी एम.एम. पिंगळे यांनी पंचनामा केला व येथील पोलीस पाटील पंचभाई यांच्या रेती सुपूर्द करण्यात आली. त्या अहवालावरुन तहसील कार्यालयाने काशिवार यांना दंडाची रक्कम भरण्याची ताथूरमाथूर नोटीस बजावली. पण आवश्यक तो दंड वसूल केला नाही. चोराला सोडून सन्याशाला शिक्षा देण्याचा प्रकारही याच प्रकरणात घडत आहे. अवैध रेती साठा ज्यांच्या घराजवळ करुन ठेवण्यात आला होता ते भिवा हेमने, विठ्ठल लोथे, भानुदास चांदेवार या गावकऱ्यांना तहसील विभागाने गौन खनिज दंडाची रक्कम घेवून कार्यालयात हजर रहावे, अशा नोटीसा बजावल्या. परंतु ज्यांनी रेती चोरून साठवणूक केली आणि ज्या रेतीचा पंचनामा झाला असतानाही त्या रेतीतस्करांना मात्र मोकाट सोडण्यामध्ये तहसील विभागाने कोणतीही कसर सोडली नाही.तहसीलदार पळसीकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, मी सध्या नवीन असून योग्य मार्गाने चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल. या कारवाईत काहीच प्रगती दिसत नसल्याचे आढळून आले. शासकीय दंडाची रक्कम शासन तिजोरीत जमा होण्याऐवजी त्या तिजोरीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सडक-अर्जुनी तालुक्यात रेतीची तस्करी
By admin | Published: October 10, 2015 2:14 AM