अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काेरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊन आता सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकसुद्धा पूर्वपदावर येऊ लागले आहे तर लोकल आणि पॅसेंजर गाड्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली. मात्र, पॅसेंजर गाड्यांना लावलेले एक्स्प्रेस तिकिटाचे दर अद्यापही कमी केले नसल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.लाेकल, पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीट दरात बराच फरक आहे. कोरोनापूर्वी पॅसेंजर गोंदियाहून चंद्रपूरला जाण्यासाठी ४५ रुपये लागत होते तर गाड्यांचा एक्स्प्रेसचा दर्जा काढूनही याच अंतरासाठी ९० रुपये मोजावे लागत आहे तर गोंदिया ते तिरोडा, गोंदिया ते तुमसर, गोंदिया ते नागपूर यासाठी प्रवाशांना दुप्पट तिकीट भाडे मोजावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढण्याचे परिपत्रक काढले. मात्र, यानंतरही पॅसेंजर आणि लोकल गाड्यांच्या तिकीट दरात कपात करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जनरल तिकीट विक्रीही बंदच - रेल्वे बोर्डाने दोन महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकावरुन जनरल तिकीट विक्री सुरु करण्याचे परिपत्रक काढले. मात्र, अद्यापही याची अंमलबजावणी करण्यात आली नाही तर रेल्वे गाड्यांनासुध्दा जनरल डबे जोडण्यात आलेले नाहीत. परिणामी गोरगरीब प्रवाशांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एमएसटीसुद्धा बंदच - रेल्वे विभागाने मागील दोन वर्षांपासृून बंद केलेली मंथली सिझन पास (एसएसटीची) सुविधा अद्यापही पूर्ववत केली नाही. त्यामुळे गोंदिया ते नागपूर, गोंदिया ते बालाघाट, गोंदिया ते चंद्रपूर असा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते रेल्वे बाेर्डाकडे बोट दाखवितात.
रेल्वे विभाग म्हणतो लवकर भाडे पूर्ववत - लोकल आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये अद्यापही एक्स्प्रेसचे भाडे आकारले जात आहे. यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहे. मागील दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. हे पॅसेंजरचे भाडे पूर्ववत केव्हा होणार, अशी विचारणा रेल्वे विभागाकडे केली असता लवकरच होणार असल्याचे सांगितले.
इतवारी-दुर्ग पॅसेंजर केव्हा येणार रुळावर - कोरोनामुळे रेल्वे विभागाने दोन वर्षांपूर्वी इतवारी-दुर्ग ही सकाळी ७.३० वाजताची पॅसेंजर बंद केली होती. ही पॅसेंजर अद्यापही सुरू केलेली नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना एस.टी. बस आणि खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे तर गोंदिया-बल्लारशा मार्गावरील सकाळी १०.३० वाजताची पॅसेंजरसुद्धा अद्यापही रूळावर आलेली नाही. अडीच हजारांवर मजुरांचा रोजगार बुडाला- गोंदिया, तिराेडा, तुमसर, आमगाव येथून दररोज जवळपास अडीच हजारांवर मजूर रोजगारासाठी पॅसेंजर आणि लोकलने नागपूर येथे रोजगारासाठी जात होते पण ही पॅसेंजर आणि लोकल गाडी बंद असल्याने व खासगी वाहनाने त्यांना परवडण्यासारखे नसल्याने त्यांचा रोजगार मागील दोन वर्षांपासून ठप्प पडला आहे.
सध्या सुरू असलेल्या गाड्या - गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस- गोंदिया-कोल्हापुर महाराष्ट्र एक्स्प्रेस- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस- रायपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस- हावडा-मुंबई मेल- हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस
प्रवासी काय म्हणतात
कोरोनाच्या नावाखाली रेल्वे एकप्रकारे प्रवाशांची लूृट केली. ती लूट अद्यापही बंद झाली नसून सर्वच व्यवहार सुरळीत झाले असताना अद्यापही पॅसेजर गाड्यांच्या तिकीट दरात कपात केली नाही तर काही गाड्या अजूनही सुरू केल्या नाही. - योगेश टाकळे, प्रवासी
रेल्वेने अद्यापही एसएसटीची सुविधा सुरू केली नाही तर दुसरीकडे पॅसेंजर गाड्यांना लावले एक्स्प्रेसचे भाडेसुद्धा कमी केलेले नाही. परिणामी आमच्यासारख्या दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. - विनोद उमक, प्रवासी