गोंदिया : कार्यालयीन कामकाज करताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी उद्भवतात. त्यामुळे चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा चुका टाळण्यासाठी तसेच कामात पारदर्शकता येण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाजाबाबत शनिवारी (दि.१८) आयोजित एकदिवसीय प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सालेकसा येथील उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट, प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) लिना फलके, जिल्हा कोषागार अधिकारी एल. एच. बाविस्कर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रभारी अधीक्षक संजय धार्मिक प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना खवले यांनी, कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाज करताना अडचणी येऊ नयेत व त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जमीन महसूल संहिता, जमीन महसूल नियम व महसूल निरीक्षक नियम याबाबत विस्तृतपणे माहिती दिली. सर्व कर्मचाऱ्यांना पुस्तके वाचण्याचा छंद असायला पाहिजे, जेणेकरून कर्मचारी एखाद्या विषयात पारंगत होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
उपविभागीय अधिकारी सिरसाट यांनी भारतीय दंड संहिता प्रकरण ९, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरणे ६, ८, १० (अ) (ब) (क) (ड), ११, ३३, ३४ आणि गाव पोलीस अधिनियम याबाबत माहिती दिली. फलके यांनी महसूल लेखा नियम पुस्तिका (गाव व तहसील नमूने) याबाबत माहिती दिली. तसेच कार्यालयात काम करताना टीमवर्क म्हणून काम करावे असे सांगितले. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने व कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक राजेश मेनन, आकाश चव्हाण, नाझर सुपचंद लिल्हारे यांच्यासह महसूल विभागातील १०१ कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. आभार धार्मिक यांनी मानले.
-----------------------------
या कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार
प्रशिक्षणात जे कर्मचारी प्रश्नांचे उत्तर सर्वप्रथम देतील त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आवाहन खवले यांनी केले होते. यामध्ये प्रश्नांचे सर्वाधिक उत्तर देणारे अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालयातील अव्वर कारकुन शांता झुर्री व सडक/अर्जुनी तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन एंचिलवार यांचा जिल्हा प्रशासनातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.