गोंदिया : मागील तीन महिन्यांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रुळावर आले नसून त्यातच आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर विभागातंर्गत थर्ड लाईन आणि इंटर लॉकिंगच्या कामामुळे ३० ते ५ सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एक्सप्रेस आणि लोकल गाड्या ९ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहे. तर ३० ते ५ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ही नागपुरवरुनच सुटणार आहे. एकूण ५८ रेल्वे गाड्या ऐन सणासुदीच्या कालावधीत रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर विभागातंर्गत थर्ड लाईनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले आहे. तर यापुढील काम शिल्लक आहे. काचेवानी ते तुमसररोड व काचेवानी रेल्वे स्थानकापर्यंत थर्ड लाईन आणि इंटरलॉकिंग व नाॅन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे २२ नियमित आणि ३६ साप्ताहिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. ३० ते ५ सप्टेंबरपर्यंत रद्द असलेल्या गाड्यांमध्ये दुर्ग-गोंदिया स्पशेल व गोंदिया दुर्ग स्पेशल, गोंदिया-इतवारी, गोंदिया-इतवारी मेमू, रायपूर-इतवारी स्पशेल, इतवारी-रायपूर, कोरबा-इतवारी, इतवारी-बिलासपूर, इंटरसिटी, टाटानगर, शालीमार एक्सप्रेस, अमृतसर-कोरबा एक्सप्रेस, कोरबा-अमृतसर एक्सप्रेस, हावडा मेल, मुंबई मेल, हावडा-अहमदाबाद, अहमदाबाद-हावडा,आझाद हिंद एक्सप्रेस, एलटीटी शालीमार एक्सप्रेस, सिंकदराबाद-रायपूर, रायपूर-सिंकदराबाद, बिलासपूर भगत की कोठी, रीवा इतवारी, पुरी -गांधीधाम, गांधीधाम -पुरी, पोरबंदर या गा गाड्या रद्द राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुन्हा आठ ते दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.