नियमांना तिलांजली : नगर परिषद प्रशासनाचा कारभार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण होणे ही सामान्य बाब आहे. मात्र एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे स्थानांतरण होणे ही आश्चर्यजनक बाब असून असाच प्रकार जिल्ह्यात घडला आहे. तिरोडा नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याचे नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून स्थानांतरण करण्यात आले आहे. यातून विभाग किती तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती येते. महाराष्ट्र नगर परिषदेत कार्यरत राजस्तरीय संवर्ग कर्मचाऱ्यांचे नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून स्थानांतरण करण्यात आले. अवघ्या राज्यातच स्थानांतरणाचा हा कार्यक्रम घेण्यात आला असतानाच जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेले कर निर्धारण व प्रशासकीय संवर्गातील कर्मचारी झामसिंग चव्हाण यांचेही स्थानांतरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे झामसिंग चव्हाण हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले असून असे असतानाही त्यांचे देसाईगंज (गडचिरोली) येथे स्थानांतरण करण्यात आले व तसे आदेश काढण्यात आले आहेत. या प्रकारातून मात्र संबंधित विभाग किती तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती येते. एखाद्या खाजगी कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती तंतोतंत न ठेवणे ही बाब लक्षात घेता येते. येथे मात्र शासनाच्या खात्यातच कर्मचाऱ्यांच्या माहितीचा अभाव असल्याचा हा प्रकार स्थानांतरणाच्या या प्रकारातून उघडकीस आला आहे. यातून शासकीय कार्यालयातील कामकाजातील पारदर्शिता पुढे आली आहे.नगर विकास प्रशासनाच्या या स्थानांतरणाच्या कारभारामुळे मात्र नगर परिषद वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचेही केले स्थानांतरण
By admin | Published: June 16, 2017 1:03 AM