तिरोडा : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील नागझिरा अभयारण्यला लागून असलेल्या आणि जंगलव्याप्त गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी गावकऱ्यांच्या सहभागातून कायापालट केला. त्यामुळे या शाळेची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा आहे.
चोरखमारा हे ५०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. मुख्याध्यापक एच. एम. रहांगडाले व सहायक शिक्षक संजय मडावी यांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यामुळे या गावातील विद्यार्थी शाळेकडे आकर्षित झाले. विद्यार्थ्र्याना शाळेत शैक्षणिक साहित्य मिळत आहे. शाळा संपूर्ण डिजिटल असून दोन स्मार्ट दूरदर्शन संच शाळेत उपलब्ध आहेत. दीक्षा ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. नीटनेटकेपणासह विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळेत प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे म्हणून शाळेची रंगरंगोटी केली. शाळेत परसबाग फुलविली. सुंदर बगिचा तयार केला. ग्रामपंचायतच्या मदतीने शाळेला दूरदर्शन संच, डी.जे.साऊंड बॉक्स, डेस्क बे्च, पिण्याच्या शुध्द पाण्याकरीता आर.ओ. उपलब्ध करुन दिले. चोरखमारा गावापासून दहा किलोमीटर अंतरावरच्या आत शिक्षणाची सोय नाही म्हणून पाचवा वर्ग उघडण्याकरिता जिल्हा परिषदेकडे प्रस्तावसुध्दा पाठविण्यात आला आहे. शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी करुन शाळा परिसर स्वच्छ केला. ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत चोरखमारा गावाला महाराष्ट्रातून स्वच्छता अभियान पारितोषिक मिळाल्यामुळे आजही गावातील नागरिकांना स्वच्छतेची सवय कायम आहे. गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व शिक्षणाचे महत्व सांगून आदर्श विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच कंचना रामटेके, उपसरपंच मधुकर दहीकर व सर्व सदस्य तसेच शाळा समितीचे अध्यक्ष गिरधारी गेडाम, शालू उईके, पुरुषोत्तम कुंभरे, एम.डी.पारधी, गटशिक्षणाधिकारी डी.बी.दिघोरे, वरिष्ठ शिक्षणाधिकारी विलास डोंगरे यांनी शिक्षकांना नेहमीच मार्गदर्शनाचे कार्य केले.
......
पर्यटकांनी शाळेला द्यावी भेट
नागझिरा प्रवेश करण्याकरिता चोरखमारा गेट मधून प्रवेश करावा लागतो. नागझिरा सफारीकरीता येताना पर्यटकांनी चोरखमारा येथील शाळेला सुध्दा भेट द्यावी, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीना मार्गदर्शन करुन त्यांना प्राेत्साहान द्यावे, असे मुख्याध्यापक एच.एम.रहांगडाले व सहायक शिक्षक संजय मडावी यांनी यांनी सांगितले.