समस्या कायमची : आमगाव मार्गावरील हे प्रकरण नित्याचेचगोंदिया : अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे. गोंदिया शहरातील मार्ग म्हणजे व्यवसायिकांच्या वहिवाटीची जागा ठरली आहे. यामुळेच वाहनधारकापुढे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु वाहतूक विभाग व परिवहन विभाग दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. गोंदिया-आमगाव राज्य मार्गी ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचे अतिक्रमण आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ट्रान्सपोर्ट व्यावसायीक जड वाहने दिवसभर उभे करून ठेवतात. राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूला उभ्या वाहनांची रांग राहत असल्यामुळे हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गावर होत असलेल्या वाहतूक नियमांचा उल्लंघनावर कारवाई करणे आव्हाण ठरले असतांना सबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे श्रीमंत व्यवसायिकांच्या दारी वाहतूक नियम गहाण ठेवण्यात आले काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोे. गोंदिया व जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय असून ग्रामीण भागातील नागरिकांसह तालुक्यातील जनतेचा विविध कामानिमित्त अनेक कार्यालयाशी दैनंदिन सबंध येतो. यामुळे या मार्गावरून नेहमीच वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या मार्गाने देवरी पासून ते गोंदिया पर्यंत असणाऱ्या गावातील नागरिकांची ये-जा रात्र व दिवस सुरू असते. याशिवाय कोहमारा, सडक/अर्जुनी, गोरेगाव या राज्यमार्गाने येणाऱ्या प्रवाशांनाही आमगावकडे जाण्याकरिता फुलचूर नाका ओलांडून याच मार्गाने जावे लागते. दरम्यान, फुलचूर नाक्यासमोर काही अंतरावर गोंदिया- आमगाव या मार्गावर ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी जड वाहने उभी असतात. यामुळे या मार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे वाहतुकीस रस्ता कमी पडत आहे. याचा त्रास वाहनचालकांना सहन करून घ्यावा लागतो. या मार्गावर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांचे कार्यालय आहे. यामुळे या महत्वपूर्ण कार्यालयात जनतेची अनेक कामे असतात. दिवसभर या मार्गाने खाजगी वाहने त्याचप्रमाणे एसटी बसगाड्या, काळी-पिवळी गाडी, तिनचाकी आॅटो, दुचाकी गाड्या सारखी वाहने धावत असतात. जिल्हा परिषद मधील काही महत्वपूर्ण कामे त्वरित करून घेण्याच्या दृष्टीने वाहनचालक अतिवेगाने गाडी चालवित असताना रस्त्यावर दोन्ही कडेला उभी, असलेली जड वाहनांवर अनावधानाने छोटे वाहन आदळल्यास जीवित हानी होऊन मृत्यूला आमंत्रण देण्याची पाळी वाहनचालक व प्रवाशांवर येऊ शकते. पर्यायाने या घटनेत अनेकांचा जीव जाऊ शकतो. वाहतूक विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील बऱ्याच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. फुलचूर नाक्याजवळ वाहतूक पोलीस नेहमीच चारचाकी वाहनांची पोलीस नेहमीच चारचाकी वाहनांची तपासणी करीत असतात. मात्र या ठिकाणाहून जवळच असलेल्या गोंदिया- आमगाव मार्गावर ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी मोठमोठी जड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी ठेवली असताना ती हटविण्यात येत नाही. यामुळे या मार्गावरील वाहनधारक प्रवाशांची चांगलीच कोंडी होत आहे. याकडे वाहतूक पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी लक्ष देतील काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे राज्य मार्गावर अतिक्रमण
By admin | Published: April 07, 2016 1:47 AM