केशोरी : जिल्ह्यातील कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरताबरोबर या परिसरात धावणाऱ्या साकोली आगारामधून साकोली-केशोरी, साकोली-कुरखेडा, साकोली-राजोली-भरनोली या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या बसमधून प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही. विनामास्कशिवाय कोणीही बसमध्ये चढणार नाही असे नियम घालून दिले असताना या नियमांच्या अंमलबजावणीकडे चालक वाहकाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी कोरोना संसर्ग वाढीचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सर्व व्यवहार नियमित सुरू झाली आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या साकोली आगारामधून साकोली-केशोरी, साकोली-कुरखेडा, साकोली-राजोली-भरनोली या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे तसेच सॅनिटाइजर वापर करणे असे नियम घालून दिले असताना बसफेऱ्यामध्ये सॅनिटाइजर वापर केला जात नाही. तसेच विनामास्क असणाऱ्या प्रवाशांना मास्क लावण्यासंबंधी सूचनाही दिल्या जात नाही, असे सांगण्यात आले आहे. याची सत्यता पडताळणी करण्याच्या प्रयत्नात एसटी बसचे निरीक्षण केले असता वास्ताविकता दिसून आली. एसटीचे चालक वाहक सुद्धा कर्तव्यावर असताना मास्क तोंडावर लावत नाही, असे निदर्शनास आले. या प्रकारामुळे कोणताही प्रवासी मास्क वापर करीत नाही. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणाऱ्या नियमांची अंमलबजावणी तंतोतंत होण्याच्या दृष्टीने एसटीच्या चालक-वाहकांना सूचना निर्गमित कराव्या, अशी मागणी होत आहे.