गोंदिया : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस निघाल्यानंतर राज्यात प्रवासासाठी सर्वच नियम शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या बसेससह खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावरून पुन्हा एकदा धावू लागल्या होत्या. मात्र, मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्याही आता घटत आहे. अगदी काही मोजक्याच कंपनीच्या काही ठराविक गाड्या रायपूर, छत्तीसगड, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक रस्त्यांवरून धावत आहेत. त्यात आजही अनेक प्रवाशांचा प्रतिसाद सकारात्मक असला तरी बस पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे वाढत्या डिझेलचा खर्च निघणेही अवघड झाल्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.
शहरातून थेट रायपूर, नागपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, पुणे आदी शहरासाठी आजही बुकिंग होत आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी लग्नसोहळा, धार्मिक विधी कार्यक्रमासाठी या दिवसात बुकिंग होत असत. मात्र, सध्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने अनेक बुकिंग रद्द होत आहेत. कोरोना संसर्गामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील वर्षी चांगलाच फटका. आता थोडी फार सुधारणा होत असतानाच पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रॅव्हलच्या फेरीतही घट झाली आहे. तोट्यात चाललेल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनाही शासनाने दिलासा देण्याची गरज आहे.
---------------------------
कोरोनापूर्वी जसे मोठ्या शहरासाठी बुकिंग होत होत्या. याच लग्नसराईचा हंगाम महत्त्वाचा होता. मात्र, आता कोरोना पुन्हा फोफावत असल्यामुळे बुकिंग रद्द होत आहेत. परिणामी गाड्या उभ्या झाल्या आहेत. कमाई काहीच नसून खर्च मात्र सुरूच राहणार आहेत.
-हितेश अरोरा अरोरा ट्रॅव्हल्स, गोंदिया.
---------------------------
कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पूर्वीसारखा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिकांचा दररोजचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. या व्यवसायात आर्थिक भांडवल मोठे लागत असल्याने बँकांचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे उत्पन्नही घटले आहे. आमच्या कुटुंबाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-रंजीतसिंह गुलाटी, संदीप ट्रॅव्हल्स गोंदिया
-----------------------------
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. आताच कुठे चार महिने चांगली सुरुवात झाली होती. तोपर्यंत पुन्हा एकदा संसर्ग वाढत असल्याने ट्रॅव्हल्स व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील गाड्यांवर बंदी लावल्याने आता काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
-घनशाम पानतवने
पवन ट्रॅव्हल्स, गोंदिया.