गोंदिया : रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने ट्रॅव्हल्स जळाल्याची घटना नागपूर- रायपूर मार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी (दि.२२) रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.प्राप्त माहितीनुसार एका खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०४, एनए ७७७६ ही मंगळवारी रात्री रायपूरहून नागपूरकडे प्रवासी वाहून नेत होती. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड रेल्वे क्रॉन्सिंगजवळ ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ट्रॅव्हल्स थांबविली, तसेच ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर काही क्षणांत ट्रॅव्हल्सची आग वाढली. सौंदड येथील नागरिकांनी ट्रॅव्हल्सकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, तसेच या घटनेची माहिती सडक अर्जुनी येथील व हायवे अग्निनशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे वाहन काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशनम वाहनाच्या मदतीने ट्रॅव्हल्सला लागलेली आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी घेतली आहे.ट्रॅव्हल्समध्ये होते ३५ ते ४० प्रवासी - रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० प्रवास करीत होते. ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यानंतर चालकाने ट्रॅव्हल्स थांबवून प्रवाशांना वेळीच बाहेर काढले. त्यामुळे सर्वच प्रवासी सुरक्षित असून, मोठी दुर्घटना टळली.
ट्रॅव्हॅल्सने घेतला अचानक पेट, जीवित हानी टळली; सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड-फुटाळाजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 02:50 IST