गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात उदासीनता असल्यामुळे गर्भावस्थेत गर्भवतींची योग्य ती काळजी घेत नसल्यामुळे कुपोषित बालके जन्माला येतात. गर्भावस्थेतील महिलांना संतुलित आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटातील बालके कुपोषित होतात. परिणामी, कुपोषणाचे प्रमाण वाढते. गोंदिया जिल्ह्यात सन २०२० मध्ये बाल विकास केंद्रांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २४१ बालके कुपोषित आढळली. त्यात गोंदिया तालुक्यात ७५, अर्जुनी-मोरगाव २०, सालेकसा १६, देवरी २०, सडक-अर्जुनी ५, आमगाव १८, तिरोडा ३४, गोरेगाव ५३ अशी २४१ बालके कुपोषित जन्माला आलेली आहेत. पूर्वीच्याच असलेल्या आणि सन २०२० मध्ये कुपोषित जन्माला आलेल्यांपैकी अति तीव्र कमी वजनाच्या ३०१, तर मध्यम कमी वजनाचे एक बालक अशा ३०२ बालकांना पोषाहार केंद्रात दाखल करण्यात आले. यापैकी अति तीव्र कमी वजनाच्या २३५ बालकांच्या वजनामध्ये सुधारणा झाली आहे. मध्यम कमी वजनाच्या एका बालकांची सुधारणा झाली आहे, तर ६६ बालकांच्या वजनात सुधारणा झालेली नाही. सद्य:स्थितीत गोंदिया जिल्ह्यातील ग्राम बालविकास केंद्रांमध्ये अति तीव्र कमी वजनाची ३८ बालके उपचार घेत आहेत. त्यात सालेकसा तालुक्यातील १७, सडक-अर्जुनी तालुक्यातील २०, तर तिरोडा तालुक्यातील १ अशा ३८ बालकांचा समावेश आहे.
बॉक्स
कोणत्या वर्षात किती कुपोषितांवर उपचार
सन २०१६- १८०
सन २०१७-२७८
सन २०१८-२२२
सन २०१९-१०३
सन २०२०- ३०२
बॉक्स
पाच वर्षांत ७८५ बालके कुपोषणमुक्त
गोंदिया जिल्ह्यातील कुपोषित बालकांवर पोषाहार केंद्रात उपचार करण्यात आले. या पाच वर्षांत गोंदिया जिल्ह्यातील ७८५ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. सन २०१६ मध्ये १७० बालके, सन २०१७ मध्ये २०४, सन २०१८ मध्ये ११८, सन २०१९ मध्ये ५७ तर सन २०२० मध्ये २३६ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.
बॉक्स
कुपोषित बालकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी अति तीव्र कमी वजनाच्या बालकांना संतुलित आहार देऊन त्यांचे वजन वाढवून त्यांना सामान्य वजनाच्या श्रेणीत आणण्यासाठी नियमित प्रयत्न केले जातात. डॉक्टरांच्या देखरेखीतून कमी वजनाची बालके सामान्य श्रेणीत येतात.
-डॉ. अमित खोडणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सालेकसा.