गोंदिया : जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे केटीएस सामान्य रुग्णालयात बालकांसाठी शीघ्र हस्तक्षेप केंद्र या विभागातर्फे नुकतेच दिव्यांग बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. प्रदीप गुजर, शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे समन्वयक पारस लोणारे, समुपदेशक अजितसिंग, संजय बिसेन उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. अमरीश मोहबे यांनी महाराष्ट्रात २५ जिल्ह्यांत हा शीघ्र हस्तक्षेप उपचार केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात गोंदियाचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना जन्मत: असलेले आजार, बर्थ डिफेक्ट, विकासात्मक वाढीमुळे होणारे दृष्टिदोष, श्रवण दोष, वाचा दोष, वर्तनविषयक समस्या, अध्ययन क्षमता व बालपणातील आजार यासाठी विनामूल्य तपासण्या व उपचार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीला गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत रेफर झालेल्या विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांचे विशिष्ट रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन बाह्यसंपर्क आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या पुढकाराने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पालकांना मार्गदर्शन करताना डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, पालकांनी बाळाच्या आरोग्याप्रती सजग असले पाहिजे. जन्मानंतर अल्पावधीत जर अपंगत्वाचे निदान झाले तर तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर उपचार करून त्यावर मात करता येते; परंतु अपंगत्व लपवून ठेवले तर समस्या वाढते व बालकांच्या आयुष्यभर परावलंबी जीवन पत्करावे लागते, असे सांगितले.
.....
७० बालकांची तपासणी
यावेळी शीघ्र प्रतिसाद क्लिनिकच्या डॉ. प्रदीप गुजर व त्यांच्या चमूने ७० बालकांची आरोग्य तपासणी व उपचार व समुपदेशक केले. अत्यावश्यक बालकांना संदर्भ सेवा दिली. हा स्पेशल कॅम्प यशस्वी करण्यासाठी पीयूष हारोडे, रोशन कुर्वे, पूजा बैस, अक्षय राठोड, प्रकृती मनोहर, रिना नेवारे, अमित शेंडे व लिल्हारे यांनी सहकार्य केले.