गोंदिया : शहरात शनिवारी सायंकाळ ५ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळवाऱ्यामुळे शहरातील कुडवा लाईन परिसरातील माजी आ. राजेंद्र जैन यांच्या घरासमोरील एक मोठे पिंपळाचे झाड रस्त्यावर व विद्युत तारांवर कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र झाडाखाली असलेली दुचाकी वाहने आणि पोलीस चौकीचे नुकसान झाले. विद्युत तार तुटल्याने सायंकाळी ५ वाजतापासून शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
कुडवा लाईन परिसरात माजी आ. राजेंद्र जैन यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानासमोर रस्त्याच्या बाजूला मंदिरालगत एक फार जुना मोठा पिंपळाचा वृक्ष आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळामुळे हे झाड रस्त्याच्या मध्यभागी कोसळले. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर कोसळल्यामुळे विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. तर या परिसरातील रहिवाशांच्या घरासमोर उभ्या ठेवलेल्या तीन-चार दुचाकींची मोडतोड झाल्याने नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, ही बाब लक्षात येताच माजी आ. राजेंद्र जैन यांनी अग्निशमन विभाग आणि पोलीस विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे वाहनसुध्दा घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर झाडाच्या रस्त्यावर पडलेल्या फांद्या हटविण्याचे कार्य सुरू केले होते.