केशोरी : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकु मंडल यांच्या मार्गदर्शनात आरोग्य पर्यवेक्षिका हाडगे यांचे पथक शासनाकडून प्राप्त झालेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात जावून राबविणे सुरू केले आहे; परंतु अजूनही आदिवासी नागरिकांकडून लसीकरण करून घेण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य पथकांना परत यावे लागत आहे. घरोघरी जावून लसीकरणासंबंधी गैरसमज दूर करण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेले कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे केशोरीसह अनेक गावे प्रभावित झाली होती. बऱ्याच नागरिकांना त्यामध्ये जीव गमवावा लागला, तरीही या भागातील आदिवासी नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास तयार नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण न करताच परत यावे लागते, हे लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी एक स्वतंत्र पथक तयार करून लसीकरणाविषयी आदिवासी नागरिकांच्या मनात झालेले गैरसमज दूर करण्यासाठी घरोघरी जावून गैरसमज दूर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १०० टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गैरसमजुतीमुळे आदिवासी नागरिकांनी लसीकरणाकडे फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:21 AM