बाराभाटी : परिसरातील शेतकरी पूर्णत: शेतीवरच अवलंबून आहेत हे नाकारता येत नाही. खरिपाचे धान पिकवून शेतकरी शासनाला विकतो; पण शासनाच्या आदिवासी महामंडळ व सहकारी संस्थेकडून शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळालाच नाही. कोरोनाच्या अशा गंभीर काळात बोनस तात्काळ द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था असून, जवळच नवेगावबांध येथे व्यवस्थापकीय कार्यालय आहे. येथील अधिकारी-कर्मचारी व संस्थांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधूनही बोनस जमा झाला नाही. खरीप हंगामाचे धान आदिवासी विविध सहकारी संस्थेत शेतकऱ्यांनी विकले. याला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लोटून गेला; पण बोनस मिळण्याचे नावच नाही. या प्रकाराने शेतकरी हतबल झाले आहेत.
जानेवारी महिन्यात धान आदिवासी सोसायटी दिले; परंतु अजून बोनस मिळाला नाही, कोरोनाचा प्रकोप पाहता बाहेर कामावरही जाता येत नाही. त्यामुळे धानाचा बोनस लवकर देण्यात यावा, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
----------------------
नानाविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. कोरोनामुळे काम करता येत नाही. बोनसबाबत आदिवासी विकास मंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच प्रश्न मार्गी लागेल.
- मनोहर चंद्रिकापुरे
आमदार, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र