सालेकसा: शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे ज्या आदिवासी संस्थेकडे स्वत:चे गोदाम असेल अशा आदिवासी संस्थेला खरीप व रब्बी हंगामाचे धान खरेदी करण्यास परवानगी मिळणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या धान खरेदी करणारे आदिवासी सहकारी संस्थेने लवकरात लवकर गोदाम बांधकामासाठी प्रयत्न करावेत. भविष्यात आदिवासी संस्थेकडे स्वत:चे गोदाम असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील कोटरा येथील आदिवासी विविध सहकारी संस्थे अंतर्गत असलेल्या मक्काटोला येथे रविवारी नवीन गोदाम बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि कोटरा आदिवासी सहकारी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण लटये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी सालेकसा तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष लता दोनोडे, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, सातगावचे सरपंच उमेश दोनोडे, गांधीटोलाचे सरपंच गजानन राणे, काँग्रेस कार्यकर्ता संजय देशमुख, भुमेश्वर मेंढे, संतोष बोहरे, देवराम खोटेले यांच्यासह कोटरा आदिवासी संस्थेचे पदाधिकारी, संचालक सदस्य, शेतकरी व गावकरी उपस्थित होते.