जिल्ह्यासाठी गौरव : मनोहर उईके बनले सार्क परिषदेचे स्थायी सदस्य विजय मानकर। लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील तीस वर्षांपासून आपल्या हस्तशिल्प कलेतून देश विदेशातून आपल्या कौशल्याची ओळख करून देणारे आदिवासी युवक तथा प्रसिध्द हस्तशिल्पकार मनोहर उईके यांना दक्षिण एशिया क्षेत्रीय सहयोग संगठन परिषदेच्या (सार्क परिषद) हस्तशिल्प विकास व्यापार विभागात स्थायी सदस्यत्व प्राप्त झाले आहे. हस्तशिल्प कलेच्या क्षेत्रात गोंदिया जिल्ह्याची सतत ओळख करून देणाऱ्या मनोहर उईके यांनी जिल्ह्याचे नाव देशाबाहेर पोहोचविल्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्यातील त्यांची हस्तशिल्प कारागिरी चालविणारे लाखो हस्तशिल्प कलाकार युवक-युवतींनी मनोहर उईके यांच्यासाठी गौरवोद्गार काढले आहे. सालेकसा तालुक्यातील घनदाट जंगलात असलेला एक छोटासा आदिवासी गाव म्हणून ओळख असलेला जांभळी गाव आहे. येथे एका गरीब आदिवासी ज्ञानीराम उईके यांच्या घरी ४ आॅगस्ट १९६९ ला जन्मलेले मनोहर उईके यांचे वडील गावठी स्तरावर सुतार काम करीत असत. लाकडापासून शेतीची औजारे बनविण्याचे त्यांचे काम होते. आपला मुलगासुध्दा हेच काम करून ही परंपरा पुढे न्यावे, अशी त्यांची इच्छा होती.मनोहर उईके आपल्या वडिलांचे काम शिकण्याबरोबरच त्याला जरा हटके करण्याची इच्छा राहत होती. अशात तो टाकाऊ लाकडांपासून कलात्मक वस्तू तयार करण्याचे प्रयत्न करू लागला. पुढे हळूहळू तो ‘टाकाऊ ते टिकाऊ’ असे अनेक कलात्मक वस्तुंची निर्मिती करीत सागवानच्या लाकडावर शिल्पकारी करायला शिकला. त्याने तयार केलेल्या शिल्पकलेच्या वस्तू लोकांना आवडू लागली व ते त्या खरेदी करु लागले. त्यामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रात मनोहरने आपले सर्व लक्ष केंद्रीत करीत स्वत:ला त्यात खपवून घेतले. आपल्या कलात्मक वस्तू घेऊन तो देशाच्या विविध शहरात जाऊन प्रदर्शनात भाग घेऊ लागला व शिल्पकलेच्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू लागला. त्यांच्या वाढत्या हस्तशिल्प कलेच्या मागणीमुळे त्यांनी आदिवासी स्वयंकला संस्था स्थापित करून हस्तशिल्प कला केंद्र उभारले व शेकडो युवक-युवतींना रोजगार प्रदान केले. पुढे त्यांनी सालेकसा येथे शिल्प ग्राम स्थापित केले. आज त्यांनी तयार केलेले हजारो शिल्पकार मध्य भारतासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यात आपल्या हस्तशिल्प कलेतून स्वयंरोजागर करताना इतर बेरोजगार युवक-युवतींना रोजगार देत आहेत. त्यांच्या या व्यापक कामाची पावती म्हणून अंतरराष्ट्रीय सार्क संगठनेच्या व्यापारीक परिषदेचा स्थायी सदस्य बनविण्यात आले आहे. मध्य भारतातील मुख्य हस्तशिल्पकार म्हणून प्रसिध्द असलेले मनोहर उईके आपल्या वडिलांची प्रेरणेने मागील तीस वर्षांपासून हस्तशिल्प कलेच्या क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केले. काष्ठ कलेच्या व्यतीरिक्त ग्रामीण आदिवासी भागात लोप पावत असलेल्या कला संस्कृतीलासुध्दा पुनर्जीवित करण्याचे काम मनोहर उईके यांनी केले. या गोंडी कलाकृती भिंतीचित्र, कापडावरील डिजाईन, धातुकला इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आदिवासी युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वनोपजावर प्रक्रिया, संकलन, संग्रहन या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहे. या सर्व बाबींकडे लक्ष देताना राज्य शासनाच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने जिल्हा हस्तशिल्प विकास समितीमध्ये १ डिसेंबर २००० मध्ये सदस्य नियुक्त केले. भारत सरकार वस्त्र मंत्रालय हस्तशिल्प विभागाच्जा (छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, महाराष्ट्र) क्षेत्रीय समितीने मे ३० एप्रिल २००५ ला सदस्य नियुक्त करण्यात आले. २१ मे २०१३ ला मुंबई स्थित वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आणि नुकतेच १८ मे २०१७ रोजी अंतरराष्ट्रीय स्तरावरील ८ देशांच्या (भारत, भूटान, नेपाल, बांग्लादेश, श्रीलंका, पाकीस्तान, अफगानिस्तान, मालदीव) सार्क समितीच्या व्यापारीक परिषदेत सदस्यत्व देण्यात आले आहे. वेळोवेळी होणाऱ्या सार्क संमेलनात मनोहर उईके भारतातील हस्तशिल्प कला आणि सांस्कृतिक समन्वय मंचचे व्यवहारीक व्यापारीक महत्व सादर करीत राहणार आहेत. देशातील हस्तशिल्प आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी मनोहर उईके सतत विदेशात दौरा करीत राहतील, यासाठी केंद्र शासनाने त्यांना स्थायी सदस्यत्व दिले आहे.
आदिवासी युवकाची शिल्पकला देशाबाहेर
By admin | Published: May 24, 2017 1:38 AM