ग्राहकांना फटका : शाखा व्यवस्थापकांच्या दुर्लक्षितपणामुळे वाढला त्रास अर्जुनी-मोरगाव : इंटरनेट सेवेअभावी तांत्रिक अव्यवस्थेमुळे आपण बँकांची लिंक फेल होतानाचे अनुभव घेतले आहे. मात्र येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शाखा व्यवस्थापकाच्या कार्यशून्यतेमुळे बँकींग व्यवहारच लिंकफेल झाल्याचा अनुभव तालुक्यातील ग्राहकांना येथ आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांचे काम पहिल्या भेटीत कधीच होत नाही, अशी बोंब आहे. याचा फटका तालुक्यापासून ३० ते ४० किमी अंतर कापून येणाऱ्या ग्राहकांना बसत आहे. नोटाबंदी संपल्यानंतरही येथील कर्मचाऱ्यांच्या कासवगती पॅटर्नमुळे ग्राहकांना पैसे भरणे, विड्राल करणे आणि अन्य बॅकींग कामासाठी दिवसभर ताटकळत रांगेत उभे रहावे लागते. आर्थिक व्यवहारांची देवाण-घेवाण करण्यासाठी येथे एकच काऊंटर असल्याने ग्राहकांचा खोळंबा होतो. येथे दिवसभर रांगेत राहणाऱ्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. वॉटर कुलींग मशीन आहे, पण ती कित्येक दिवसापासून बंद आहे. शाखा व्यवस्थापकांचे या गंभीर समस्येकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. बचत खात्यांच्या पुस्तकांवर एन्ट्रीबद्दल व्यवस्थापकाने वेगळाच फतवा काढला आहे. हप्त्यामधून बुधवार व शुक्रवार दिवस ठरवून दिला आहे. मात्र दिलेल्या दिवसीही प्रिटींगचे काम होत नसल्याचे ग्राहक सांगतात. याबद्दल विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे बंद बँक प्रशासनाकडून दिल्या जातात. यामुळे सामान्य ग्राहकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. मार्च अखेरची व्यापाऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येकाला पुस्तकामध्ये जमा राशी दाखविणे गरजेचे असते. नोंदी होत नसल्याने इंकमटॅक्सबद्दलच्या कामांना अडथळा येत आहे. बँकेच्या एटीएममध्ये शनिवार, रविवारला रोकड उपलब्ध नसतेच. मात्र हप्त्यातून कित्येकदा रविवारला रोकड उपलब्ध नसतेच. हप्त्यातून कित्येकदा कधी लिंक फेल तर कधी आऊट आॅफ कॅशचा बोर्ड लावला असतो. बँकेला स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर कुठेही दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. येथील शाखा व्यवस्थापक निनावे यांना वेळोवेळी या समस्यांबद्दल माहिती देऊनही ते काहीही उपाययोजना करीत नसल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. बँकेत सुव्यवस्था यावी यासाठी देणावघेवाणीचे दोन वेगळे काऊंटर, पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि ग्राहकांच्या सोईसाठी कार्यालयीन दिवशी खाते पुस्तकावर प्रिटींगची व्यवस्था करण्याची मागणी बाजीराव तुळशीकर, पी.एस. कांबळे, मन्साराम शहारे, ए.के. नखाते, श्रीकांत मानकर, गोपाल मळकाम, शीतल गायमुखे, रंजना जंगम, शंकर किरसान, मदन मेश्राम, श्रीहरी राऊत, जे.एच. खुणे यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
स्टेट बँकेच्या लिंक फेलमुळे मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2017 1:12 AM