लोकमत न्यूज नेटवर्क सिरपुरबांध : येथील सिमा तपासणी नाक्यावर बुधवारी (दि.१०) पहाटे नागपूरकडून रायपूरकडे जात असलेला ट्रक क्रमांक एमपी-एचजी ८१७६ रोडवर लावण्यात आलेल्या सिमेंट बेरिकेटवर जाऊन आदळला व उलटला. यामध्ये चालकास किरकोळ मार लागला परंतु सिमेंड बेरीकेट लावले असल्यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले सुरक्षा रक्षकांचे पार्इंटसुद्धा रोड लगत असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असून रक्षकांनी सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीकडे रस्त्याच्या बाजूला बुथ बनविण्याची वारंवार मागणी करुन सुद्धा त्यांच्या रास्त मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप सुरक्षा रक्षक करीत आहेत. या ठिकाणावर दररोजच अपघात घडत असून संभावीत दुर्घटना क्षेत्र असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन या ठिकाणी अत्याधुनिक संगणीकृत सीमा तपासणी नाका तयार केला. पण सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना नगण्य आहेत. देवरीकडून येणारी वाहने भरधाव वेगाने सीमा तपासणी नाक्यात प्रवेश करीत असतात आणि काही पावलांवरच सिरपुरबांध गावात जाण्याचा मार्ग मुख्य चौक आहे. त्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीने गतिरोधक लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सिरपूरबांध नाक्यावर ट्रक अपघातग्रस्त
By admin | Published: May 12, 2017 1:13 AM