देवरी : शहरातील अग्रसेन चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक चालकास चाकू दाखवून त्याच्याकडील ८ हजार ३०० लुटल्याची घटना बुधवारी (दि.२३) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणातील आठ आरोपी फरार असून त्यांचा शोध देवरी पोलिस घेत आहे.प्राप्त माहितीनुसार अमरावतीवरून देवरी येथे व्यापाऱ्यांचे खत घेवून आलेला ट्रक क्रमांक एमएच २६, डीई ७९०६ हा सायंकाळी ६ वाजतापासून अग्रसेन चौकात उभा करुन ठेवला.
ट्रकचालक फिरोजखा गुलाम हुसेन खान (३८) हा रात्री १० वाजता जेवण करीत होता. ट्रकमध्ये पिण्याचे पाणी नसल्याने त्याने आपल्या आपल्या भावाला पाणी आणण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविले. तो ट्रकच्या केबिनमध्ये बसून जेवण करीत होता. दरम्यान अज्ञात चार युवक हे ट्रकमध्ये शिरले, त्यांच्या तोंडावर काळा रुमाल बांधलेला होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवीत ट्रक चालकास तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते दे नाहीतर तुझा मर्डर करू असे धमकावले. ट्रक चालकाने आपल्याजवळील २८०० रु त्या अज्ञात युवकांना दिले. तर दुसऱ्या चार युवकांनी त्याच्याजवळील चाबी हिसकावली व ट्रक चालवीत रायपूरच्या दिशेने नेले.
देवरीवरून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भरेगाव फाट्याजवळून त्यांनी ट्रक देवरीच्या दिशेने वळविला. तिथे ट्रक थांबवून त्यांनी चालकाला आपल्या भावाला फोन करण्यास सांगितले. तर चालकाने त्याचा भाऊ जो देवरीमध्ये उभा होता त्याला फोन केला. तुझ्याजवळ आलेल्या व्यक्तींना तुझ्या जवळचे पैसे देवून टाक नाहीतर हे मला मारून टाकतील असे सांगितले. या चोरट्यांचे दुसरे चार साथीदारांनी चालकाचा भाऊ नदीम खान जो देवरीला उभा होता त्याला धमकावून त्याच्याजवळून पाच हजार पाचशे रुपये हिसकावून नेले. नंतर ते चारही जण पांढऱ्या रंगाच्या कारने ट्रकजवळ आले. आपल्या साथीदारांना घेऊन देवरीच्या दिशेने पसार झाले.
चालकावर चाकूने केला हल्ला
त्या चोरट्यांनी चालकाला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला असता चाकू चालकाच्या पायाला लागल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्या चोरट्यांनी ट्रकची चाबी सुद्धा घेऊन गेल्याने जखमी अवस्थेत ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकवर बसून येऊन देवरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. देवरी पोलिसांनी फिर्यादी ट्रक चालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आठही आरोपीविरुद्ध कलम ३९५,३९७,३६५ भांदवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध सुरुया तक्रारीच्या अनुषंगाने देवरी पोलीस तसेच गुन्हे अन्वेषण शाखा गोंदियाचे पोलीस शहरातील नॅशनल हायवे वरील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा शोध घेत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे देवरीतील ट्रान्सपोर्ट व्यवसायीकांमध्ये तसेच ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.