गोंदिया : देवरी येथील नाला एनएच-६ येथे एका चारचाकीवर आलेल्या आठ जणांनी ट्रक अडवून ट्रकचालकाचे हात-पाय बांधून ट्रकच्या केबिनमध्ये टाकून ट्रक पळवून नेला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता दरम्यान घडली.
ट्रकचालक प्रवीण रामभाऊ धांडे (४४,रा. जैननगर, नागपूर) हे ट्रक क्रमांक सीजी ०७-सीए ३४०० मध्ये रायपूर येथील लिंगराज कंपनीतून २५ टन ४० किलो लोखंड सळ्या असा १२ लाख ४५ हजार ६३३ रुपयाचा माल भरून नागपूर येथे जात होते. दरम्यान, देवरी नाला एनएच-६ रोड येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१ दरम्यान पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या झायलोसारख्या दिसणाऱ्या चारचाकी वाहनात आठ इसमांनी येऊन त्यांचा ट्रक अडवून ट्रकच्या केबिनमध्ये घुसले. तसेच धांडे यांना हाताबुक्क्यांनी मारून केबिनमध्ये असलेल्या नायलॉन दोरीने हात-पाय बांधून व डोळ्याला टॉवेलने बांधून ड्रायव्हर सीटच्या मागे टाकून ट्रक चालवीत नेऊन ट्रकमधील लोखंड लपवून ठेवले. त्यांनी धांडे यांना नागभीड येथील नागभीड ते नागपूर रोड नवखेडा गावाजवळ सोडून दिले. देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३४१ ,३९४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.