नवेगावबांध : येथील टी पाईंट चौकातील जय अंबे धर्म काट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकने एसटी महामंडळाच्या वाहक प्रशिक्षण वाहनाला मागील बाजूस धडक दिल्याने एसटी बसचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रशिक्षण वाहनात वाहकासह २६ शिकाऊ वाहक होते. परंतु सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी येथील टी पाईंट चौकात घडली.
भंडारा डेपोचे वाहक प्रशिक्षण वाहन क्रमांक एमएच १२ एयु ९२६५ नवीन वाहकांना प्रशिक्षण देण्यासाठी नवेगावबांध ते कोहमारा या मार्गावर नवीन शिकाऊ वाहकाना प्रशिक्षण देण्यासाठी कोहमाऱ्याकडे जात होते. दरम्यान, येथील टी पाईंट चौकातील जय अंबे धर्म काट्याजवळ रस्त्याच्या कडेला, धरम काटयाजवळ ट्रकने मागे येऊन धडक दिली. यात प्रशिक्षण वाहनाची दोन पिल्लर, खिडकी, मागील आडवे दोन अँगल तुटले व मागच्या बंपरला बेंड होऊन २० हजार रुपयांचे नुकसान झाले. याची तक्रार प्रशिक्षण वाहनाचे चालक विजय काशिराम नंदागवळी, भंडारा वाहतूक निरीक्षक प्रशिक्षण चालक यांनी नवेगावबांध पोलीस स्टेशनला केली. तक्रारीवरुन नवेगावबांध पोलिसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.