नरेश येटरे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणा : आमगाव तालुक्यातील ग्राम तिगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी वैष्णवी बोपचे गतिमंद असल्याने ती काय सांगते, काय बोलते, तिचा काय त्रास आहे हे समजणे सर्वांनाच अवघड होते. परंतु म्हणतात ना, ‘मुश्कील नही है दुनिया में, तू जरा हिंमत तो कर, ख्वाब बदल देंगे हकीकत मे, तू जरा कोशिश तो कर’ या म्हणीप्रमाणे तिने आपल्या अपंगत्वावर मात करण्याचा चंगच बांधला. बाळगलेल्या स्वप्नांना खरे उतरविण्याच्या शर्यतील ती आता ‘खैर नाही’ असेच म्हणत आहे.वैष्णवी जन्माला आली आणि थोड्यावेळाने डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत निळे पडली. आइर्-वडिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली व डॉक्टरांनी काही दिवस उपचार केले. परंतु ते उपचार पालकांना न समजणारे होते. नंतर डॉक्टरांनी बाळाला घरी घेवून जाण्यास सांगितले व त्याचदिवसापासून वैष्णवीचा प्रवास सुरू झाला आहे. शारीरिकदृष्टया चांगली असणारी वैष्णवी रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे या प्रत्येक गोष्टी इतर सामान्य मुलांच्या तुलनेत उशिरा करू लागली. चार वर्षाची झाल्यानंतर ती या दैनंदिन क्रिया करायला लागली. आई-वडिलांना हे सारे नवीनच होते. पण वैष्णवी मोठी झाल्यावर सर्व व्यवस्थित होईल असा विश्वास होता.वैष्णवीची नेमकी स्थिती काय आहे, तिचे दिव्यांगत्व, पुढे काय करावे लागेल, याची संपूर्ण कल्पना दिपा बीसेन या अंगणवाडी सविकेने दिली. पालकांना थोडीफार कल्पना होतीच की हे प्रकरण वेगळे आहे. दिपा बिसेन यांच्या मदतीने वैष्णवीचा प्रवेश पहिल्या वर्गात करण्यात आला. तरी तिला व्यवस्थीत चालता येत नव्हते. पालक तिला उचलून रोज शाळेत घेवून यायचे. गतीमंद व स्वमग्न वैष्णवी घरात एकटी खेळणारी, स्वत:त रमणारी सुरूवतीला शाळेत गोंधळून गेली. तिला शाळेत बसणे नको असायचे. पण त्यावेळी शाळेतील तिचे शिक्षक डी. पी. कावळे, यु. आर. रपटे व मेंढे यांनी तिच्यात शाळेबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शाळेतील मुले सुध्दा वैष्णवीच्या प्रत्येक कामात मदत करायला तयार झाली. वैष्णवीचे मात्र स्वत:चे एक वेगळे विश्व होते. त्यात ती हरवून जायची. त्यातून काढून तिला आपल्या सामान्य जगात आणणे हे मोठे जिकरीचे काम होते. त्यासाठी सर्व प्रथम तिला आपल्या पायाने चालता यावे म्हणून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरामधून तिला रोलेटर उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या मदतीने आइ-वडिलांकडून स्वतंत्रपणे चालण्याचा सराव सुरू केला. वाणी सदोष असल्याने ती काय सांगते, काय बोलते, तिचा काय त्रास आहे हे समजणे सर्वानाच अवघड होते.कितीतरी वेळा पडल्यावर, अडखल्यावर, रडल्यावर वैष्णवी रोलेटरने चालायला शिकली. घरापासून शाळेपर्यंत चालणे, शाळेत कुणाची मदत न घेता ती स्वबळावर वर्गात चालत जाते. चालणे सहज असणारी क्रिया तीला मात्र महाप्रयत्नाने शिकावी लागली. अजूनही धावू शकत नाही.क्षुल्लक बाबी साध्य करण्यासाठी इतका आटापीटा करावा लागतो. आता तिचे शाळेत नियमित येणे सुरू झाले. तिची शाळेत येण्याची रूची अधिक वाढली. ईयत्ता तिसरी पर्यंत दिपा बिसेन तिला विशेष शिक्षण व समायोजनातून सामान्य शिक्षणाकडे नेत होत्या. शिक्षक व वर्गमीत्र यांच्या मदतीने हे कार्य हळूहळू सुरू होते. यात सामाजिक, वैयक्तीक शारीरिक संयोजनाकडे अधिक भर होता. परिपाठात सहभागी होणे, खिचडीसाठी रांगेत बसणे, सर्वांसोबत बसून खाणे, शाळेच्या उपक्रमात भाग घेणे यासारख्या कृतीतून तिच्या सामान्यकरणाची प्रक्रि या सुरू होती. दीपा यांच्या प्रयत्नाला तिनेही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. चालू न शकणाऱ्या वैष्णवीने एक दिवस नृत्य सुध्दा केले. वर्ग चौथी पासून आता ती सामान्य वर्गात बसत आहे. आज ती सातवीत आहे. तिची गुणवत्ता इतर सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा निश्चितच कमी आहे.आता ती ३० पर्यंत अंक ओळखून वाचते. मराठी वाचते, एक अंकी गणिताचा तिचा सराव सुरू आहे. समाजशील व्यक्ती म्हणून जगण्याचा अट्टाहास करणाºया तिच्या निरंतर प्रयत्नाला गुण द्यायचे. इतर शिक्षक व सर्वात महत्वाचे तिचे पालक यांच्या मदतीने वैष्णवी एक समाजशील, समाजोपयोगी स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी तयारी करीत आहे. ही तिची तयारी व तिचे प्रयत्न इतरांना नक्कीच प्रेरणा देणारे आहेत.वैष्णवी जीवनात शैक्षणिकदृष्टया खूप सक्षम नाही. पण ज्या परिस्थितीत जन्माला आली होती त्या परिस्थितीत राहिली असती तर आयुष्यभर एका खोलीत कुणावर तरी अवलंबून असणारी व्यक्ती झाली असती. परंतु आज तिचे वर्गशिक्षक रामेश्वर बागडे, विशेष शिक्षक दिपा बसेन यांच्या मदतीने ती मुख्यप्रवाहात येत आहे.-डॉ किरण धांडेजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया.
स्वप्नांना खरे उतरवीन प्रयत्नातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:00 AM
वैष्णवी जन्माला आली आणि थोड्यावेळाने डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत निळे पडली. आइर्-वडिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली व डॉक्टरांनी काही दिवस उपचार केले. परंतु ते उपचार पालकांना न समजणारे होते. नंतर डॉक्टरांनी बाळाला घरी घेवून जाण्यास सांगितले व त्याचदिवसापासून वैष्णवीचा प्रवास सुरू झाला आहे.
ठळक मुद्देस्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी तयारी : बंद खोलीत राहण्याच्या अवस्थेतील वैष्णवी सामान्य शिक्षणाच्या प्रवाहात