गोंदिया : राज्यातील कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठ व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. समाजातील कुष्ठ व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये राज्यात सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरोग शोध व नियमित संनियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४८६ गावांत कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांनी दिली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विनाविकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत औषधोपचार देणे, विकृती प्रतिबंध करणे, समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाची संसर्गाची साखळी खंडित करणे, हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. जनजागृतीद्वारे या रोगाबाबत समाजात असलेला गैरसमज व अंधश्रद्धा दूर करता येता येईल. गोंदिया जिल्ह्यात मागील ३ वर्षांत नवीन उपचार सुरू केलेल्या मात्र कुष्ठरुग्ण राहत असलेले निवडक ४८६ गावे व त्या लगतच्या गावामध्ये ही मोहीम राबविण्याकरिता हाती घेण्यात आली आहे. फेब्रुवारी व मार्च २०२१ या कालावधीत आशासेविका, स्वयंसेवक, आरोग्यसेवक पुरुष व स्त्री, एएनएम, तसेच प्रशिक्षित बरे झालेले कुष्ठरुग्ण यांच्यामार्फत कुष्ठरोगाबाबत निकषाबाबत सर्व व्यक्तीची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना काळात आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केल्याबाबत त्यांचे कौतुक केले. समाजातील दडलेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना नियमित उपचाराखाली आणण्याबाबत मार्गदर्शन केले. संशयित कुष्ठ व क्षयरोगाची लक्षणे, रोगाची लागण, तपासणी व उपचाराबाबत माहिती दिली.