गोंदिया : समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान १ जुलै ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविले जाणार आहे. यात जिल्ह्यातील ९५६ गावांमधील १३ लाख ९४ हजार ११४ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व पुरुष स्वयंसेवक गृहभेटी देऊन समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणणार आहे.
नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, समाजात क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, त्याचबरोबर क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारांवर आणणे, मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी, आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करून औषधोपचार केले जाणार आहेत.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विनाविकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत औषधोपचार दिला जातो. विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाची संसर्गाची साखळी खंडित करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. जनजागृतीद्वारे क्षयरोगाचे लक्षणे, तपासणी, उपचार, औषधोपचार व संदर्भसेवा, उपलब्ध सोईसुविधा दिल्या जातात. प्रत्येक क्षयरुग्णांना निक्षय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रतिमाह ५०० रुपये अनुदान देण्यात येतो. त्याचबरोबर मोफत क्ष-किरण तपासणी, थुंकी तपासणी, एमडीआर-एक्सडीआर रुग्णांची तपासणी इतर सर्व सोईसुविधा शासकीय व खासगी रुग्णालयांत उपलब्ध केल्या जातात.
कोरोनाच्या आपातकालीन कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचारांखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी १ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यात सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक (कुष्ठरोग) तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर यांनी दिली.
----------------------------
२४८ पथकांचे केले गठन
जिल्ह्यात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, आदी १२४१ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यवेक्षणासाठी जिल्ह्यात एकूण २४८ पथके स्थापन करण्यात आली आहेत. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नियोजन वेळापत्रकाप्रमाणे कार्य सुरू आहे. जिल्ह्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान २०२१-२२ ही कार्यवाही ‘आजादी का अमृत महोत्सव’चे औचित्य साधून राबविण्यात येत आहे.