मान्यवरांचे मत : देवरी येथे फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावादेवरी : ग्रामीण भागातील आदिवासी, गोरगरीब विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळावे व संबंधित अभ्यासक्रमातून रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात, असे मार्गदर्शन आ. संजय पुराम यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण संचालनालय आणि सी.एस. इन्स्टिट्युट आॅफ टेक्नालॉजी (पॉलिटेक्निक) देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय फिरत्या तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन सोमवारी छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगीत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.उद्घाटन देवरी-आमगाव क्षेत्राचे आ. संजय पुराम यांच्या हस्ते, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालय नागपूरचे उपसचिव आर.व्ही. येनकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मेळाव्यात वर्ग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका, पदवी, व्यवस्थापन शास्त्र, आयटीआय व इतर व्यवसायविषयक संधींची माहिती देण्यात आली. याप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून इन्स्टीट्युट आॅफ टेक्नालॉजी नागपूरचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र गोळे, शंकरराव धवड पॉलिटेक्नीक नागपूरचे संचालक व्ही.बी. जाधव, शासकीय तंत्रनिकेतन सेंदूरवाफाचे प्राचार्य एस.डी. आटे, देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक, नगराध्यक्ष सुमन बिसेन, नगरसेवक यादवराव पंचमवार, सिव्हील कॉन्ट्रक्टर सी.के. बिसेन, जिल्हा भाजपचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे सचिव झामसिंग येरणे आणि सहसचिव अनिलकुमार येरणे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. सुरेंद्र गोळे, व्ही.बी. जाधव व अध्यक्ष आर.व्ही. येनकर यांनी तंत्रशिक्षणाचे महत्व विशद करून मार्गदर्शन केले. आ. संजय पुराम, झामसिंग येरणे आणि विरेंद्र अंजनकर यांनी ग्रामीण भागातील आदिवासी, गोरगरीब विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळून रोजगाराच्या संधी प्राप्त करावे, असे मार्गदर्शन केले. मेळाव्यात बहुसंख्य शाळा, विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य मनिष लेंडे व संचालन प्रा. घनश्याम निखाडे यांनी केले. (प्रतिनिधी)
व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळा
By admin | Published: January 06, 2016 2:12 AM