नागरिकांची मागणी : वारंवार होतो वीज पुरवठा खंडितलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आधुनिक काळात विजेशिवाय कोणतीही व कसलीही कामे होऊ शकत नाही. विजेची गरज आज सर्वांनाच आहे. वीज आता प्रत्येकाची अत्यावश्यक बाब झाली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारा मानवही अगतिक होतो. सर्व कामे थांबतात. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे वेळेवर अनेक कामे करता येत नाही. वेळेची व पैशाची नासाडी होते. याचा फटका आता आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या सालेकसा तालुक्याला चांगलाच बसत आहे. विजेच्या बाबतीत हा अन्याय सालेकसा तालुक्यानेच का सहन करायचा? असा प्रश्नदेखील तालुकावासीयांनी उपस्थित केला आहे. सालेकसात सकाळी आणि दुपारी भारनियमन होत असते. या भारनियमानातून सालेकसा तालुक्याचा विकास होणार काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पण कोणीही लोकप्रतिनिधी यावर काहीही बोलायला तयार नाही. सर्व जण मुंग गिळून बसल्याचे दिसून येत आहेत. विद्युत भारनियमनामुळे दुपारी १ वाजतानंतर सर्व शासकीय कार्यालयातील कामे खोळंबून जातात. सर्व संगणक बंद पडतात. झेरॉक्स मशिन चालत नाही. १५ ते २० किमी अंतरावरून आलेल्या आदिवासींची कामे होत नाही. त्यांना लहानसहान कामासाठी अनेकवेळा चकरा माराव्या लागतात. दहावी व बारावीची परीक्षा विद्युत भारनियमनातच पार पडली. आता वरिष्ठ अभ्यासक्रमांच्या परीक्षेस बसलेल्या व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठाच त्रास होत आहे. तापमान ४० च्या पुढे आहे. प्रचंड उकाडा आणि उष्णता आहे. या प्रकारामुळे व त्यात भर म्हणून विद्युत भारनियमनामुळे परीक्षार्थी आता त्रस्त होवून गेले आहेत. याचा परिणाम त्यांच्या निकालावरही होण्याची दाट शक्यता आहे.विद्युत भारनियमनाच्या समस्येशिवाय आणखी एका समस्येने त्यांना बेजार करून सोडले आहे. वीज पुरवठा सुरू असल्यावर विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो. यामुळे काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्युत मंडळावर मोर्चासुद्धा काढला. त्यांना केवळ आश्वासने देण्यात आले. पण प्रत्यक्षात काहीही फरक पडला नाही. प्रशिक्षण केंद्रातही विद्युत पूरवठ्याअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सालेकसा व आमगाव खुर्द या परिसरात विद्युत बिल वसुली चांगली आहे. परंतु आमगाव खुर्द हे पिपरीया फिडरला जोडलेले आहे. पिपरीया परिसरात शेती व इतर कामांसाठी वीज वापरत असताना त्यांच्याकडून वसुली बरोबर होत नाही. त्याचा परिणाम आमगाव खुर्द व सालेकसा येथील नागरिकांना व शासकीय कार्यालयांना भोगावा लागतो. त्यामुळे आमगाव खुर्दचे फिडर वेगळे करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु अजुनपर्यंत त्याबाबत काहीच काम विद्युत मंडळाने केलेले नाही. त्याचा परिणाम सालेकसातील शासकीय कार्यालयांना विद्युत भारनियमनाच्या स्वरुपात भोगावा लागत आहे.
नक्षलग्रस्त भागात भारनियमन बंद करा
By admin | Published: June 09, 2017 1:29 AM