बुधवारी जिल्ह्यात २९ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ६० नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात मे महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात घट झाल्याने कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील २ टक्क्यावर आला. तर रिकव्हरी रेट ९७.४७ टक्क्यांवर पोहचला आहे. ही जिल्हावासीयांच्या दृष्टीने निश्चित दिलासादायक बाब आहे. मात्र संसर्ग आटोक्यात असल्याने नागरिक पुन्हा बिनधास्तपणे वागू लागले आहे. पण कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसून पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वत:ची आणि कुटुंबीयाची काळजी घेतल्यास कोरोनाला जिल्ह्यातून लवकरच हद्दपार करणे शक्य आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १६६९७१ जणांचे स्वॅब नमुने तयार करण्यात आले आहे. यापैकी १४२००१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १६०२४० जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १३९३७३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०८०० कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३९७६९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३४१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ८२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
५६ दिवसांनंतर एकही मृत्यू नाही
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे बाधितांसह मृतकांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत होती. ४ एप्रिलपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे सत्र सुरू झाले होते १ जूनपर्यंत कायम होते. त्यानंतर २ जूनला एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. ५६ दिवसात प्रथमच कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या सत्राला ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे.
................
२७८१ नमुन्यांची चाचणी ६० पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६६२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १११९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. एकूण २७८१ नमुन्यांची चाचणी केल्यानंतर त्यात ६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. याचा पॉझिटिव्हिटी रेट २.१६ टक्के होता.
........
दुसऱ्या डोससाठी वेटिंग लिस्ट वाढली
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी व्यापक स्वरूपात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील १४० लसीकरण केंद्रावरून लसीकरणाची मोहीम राबविली जात असून या अंतर्गत आतापर्यंत २ लाख ५६ हजार ३८४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात १ लाख ९७ हजार ८६१ नागरिकांना लसीचा पहिला डोस तर ५८५२३ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांची वेटिंग लिस्ट वाढतच चाचली आहे.