गोंदिया : नवीन वर्ष नक्कीच जिल्ह्यासाठी भाग्याचे ठरत असल्याचे दिसत असून, कोरोनाबाधितांच्या घटत चाललेल्या आकडेवारीवरून याची प्रचिती येत आहे. सोमवारी (दि. १८) जिल्ह्यात १४ नवीन बाधितांची भर पडली असतानाच त्यापेक्षा दुप्पट म्हणजेच ३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यात आता कोरोना नक्कीच हरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४०३७ पर्यंत पोहोचली आहे. मात्र, त्यातील १३६८६ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असल्याने तेवढाच दिलासा जिल्ह्याला मिळाला आहे. यामुळेच सध्या जिल्ह्यात १७० क्रियाशील रुग्ण आहेत, तर जिल्ह्यातील १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ टक्के, तर बाधित रुग्णांचा मृत्युदर १.२० टक्के असून, डब्लिंग रेट २२६.४ दिवस आहे.
असे असतानाच जिल्ह्यात सोमवारी १४ नवीन बाधितांची भर पडली असून, यात गोंदिया तालुक्यातील ६, गोरेगाव १, आमगाव ४, सालेकसा १, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. अशातच ३० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २०, तिरोडा १, आमगाव १, सालेकसा १, देवरी २, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यात १७० बाधित असून, यात गोंदिया तालुक्यात ९८, तिरोडा १७, गोरेगाव ८, आमगाव २५, सालेकसा ८, देवरी ५, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव ४, तर इतर जिल्हा व राज्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे.
---------
जिल्ह्यात १२३१५९ चाचण्या
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना
विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत १२३१५९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये आरटी-पीसीआर ६०१६७ नमुने असून, त्यातील ४८६६४ नमुने निगेटिव्ह आले, तर ८२८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. रॅपिड अँटिजेन चाचणीतून आतापर्यंत ६२९९२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले असून, यामध्ये ५६९४७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, तर ६०४५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.
------------------------------
जिल्ह्यात १८१ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत १८१ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात १०१, तिरोडा २२, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव ११, तर इतर जिल्हा व राज्यातील १० रुग्णांचा समावेश आहे.