गोंदिया : शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ता धनेंद्र श्रीराम भुरले (५२) यांच्यावर शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कटंगी-टेमणी रस्त्यावरील महाराजा ढाब्याजवळ गोळी चालविण्यात आली. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी गणेश जाधव (रा. मामा चौक) व उदय गोपलानी (रा. हनुमान चौक) यांना अटक केली आहे.
टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजतादरम्यान ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळी भुरले यांच्या चेहऱ्यातून मानेच्या बाजूला शिरली होती.
चार डॉक्टरांनी केली तीन तास शस्त्रक्रिया
मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीजवळ गोळी अडकल्याने ती गोळी काढण्यासाठी डॉ. दीपक बाहेकर, डॉ. वैभव नासरे, डॉ. जांभूळकर व डॉ. अग्रवाल या चार डॉक्टरांनी त्यांच्यावर ३ तास शस्त्रक्रिया करून गोळी बोहर काढली. भुरले यांनी पोलिसांना बयाण दिले असून, या प्रकरणात रामनगर पोलिसांनी दोघांना पकडले आहे. यातील आणखी दोन आरोपी फरार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.