कपिल केकत, गोंदिया: शहर पोलिस ठाण्यांतर्गत सिंगलटोली मैदान दर्ग्याजवळ चाकूने भोसकून तरूणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ६:४० वाजता दरम्यान घडलेल्या या याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून दोघा आरोपींना पकडले आहे.
आरोपी प्रशांत उर्फ दद्दू सुरेश वाघमारे (३०,रा. सिंगलटोली) व अविनाश ईश्वर बोरकर (४२,रा. लक्ष्मीनगर) यांनी बुधवारी (दि.१७) सायंकाळी ६:४० वाजता दरम्यान सिंगलटोली मैदानात गंगाधर विजय चांद्रिकापुरे (४०,रा. रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड) याच्या पोटावर, छातीवर व शरीरावर वार करून गंभीररित्या जखमी करुन जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी भान्यासं कलम १०९, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी प्रकरणातील आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षकांना दिले होते.
त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात शहर निरीक्षक किशोर पर्वते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांचे नेतृत्वात विविध पथक तयार करून शोध सुरू करण्यात आला.
यासाठी घटनास्थळावरून प्राप्त माहिती, परिसरातील नागरिकांची विचारपूस व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या पोलिसांनी प्रशांत वाघमारे याला डोंगरगड येथून तर अविनाश बोरकर याला रामटेक येथून पकडून जेरबंद करण्यात आले.
पत्नीच्या बदनामीचा रोग होता डोक्यात
प्रकरणात दोघांची चौैकशी केली असता अविनाश बोरकर याने सांगितले की, गंगाधर आणि तो मित्र असून गंगाधर हा नेहमी अविनाशच्या पत्नीची बदनामी करीत होता. त्याचा राग अगोदर पासून डोक्यात असतानाच घटनेच्या दिवशी ते तिघे दारू पित असताना गंगाधरने परत अवीनाशच्या पत्नीची बदनामी केली. यामुळे दारूच्या नशेत राग आल्याने त्याला जिवानिशी ठार करण्याच्या उद्देशातून चाकूने वार केल्याचे सांगीतले. प्रशांत वाघमारे याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत (दि.२२) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.