विशेष पथकाची कामगिरी: १९ हजारांचा माल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आयपीएल क्रीकेट मॅचवर सट्टा चालविणाऱ्या दोघांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी (दि.९) ही कारवाई करण्यात आली असून दोघांकडून १९ हजार ३१० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. शहरातील राजेंद्र वॉर्ड माताटोली येथील आरोपी मनोज सुरेशकुमार दरहाई (३२) व अजय अशोक लोंगाणी (२५,रा. फुलचूर नाका) हे आपल्या भाड्याच्या खोलीमध्ये दिल्ली डेअरडेविल्स व गुजरात लॉयन्स या क्रिकेट आयपीएल मॅचच्या थेट प्रक्षेणपावर हार जीतचा खेळ खेळविताना मिळून आले. त्यांच्याकडून एक व्हीडीओकॉन पोर्टेबल १४ इंच कलर टी.व्ही किमत १५०० रुपये, एस युसीएन सेट आॅफ बॉक्स किमत १५०० रुपये, एक रिमोट कंट्रोल किमत १०० रुपये, एक जीओ कंपनीचा मोबाईल किमत १० हजार, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किमत तीन हजार रूपये, एक मायक्रोमॅक्स मोबाईल किमत एक हजार, एक झोलो कंपनीचा मोबाईल किमत एक हजार, सीसका कंपनीचा पावर बॅक किमत एक हजार, दोन हाटपेन किमत १० रुपये, एक सॅमसंग कंपनीचा हेडफोन ५० रुपये, एक थ्री पीन केबल ५० रुपये, एक सेट टॉप बॉक्स चार्जर किमत ५० रुपये, एक कॅलकुलेटर किमत ५० रुपये असा एकूण १९ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.
आयपीएल सट्टा चालविणाऱ्या दोघांना अटक
By admin | Published: May 12, 2017 1:17 AM