गोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्रात असलेल्या इंदिरानगर तिल्ली येथील देवानंद सोनवाने यांच्या शेतातील विहिरीत ३ जानेवारीला एक बिबट्या विहिरीत आढळला. बिबट्या या वन्यप्राण्याचा मृत्यूचा कारणांचा शोध घेत असता जवळच नीलगायीचे अवषेश आढळले. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली; परंतु त्यांचे नाव सांगण्यास वन विभाग टाळाटाळ करीत आहे.
एका आरोपीला १५ जानेवारीला, तर दुसऱ्याला १६ जानेवारीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले; परंतु त्या आरोपींचे नाव वन विभाग गुप्त ठेवत असल्याने या प्रकरणात मोठ्या व्यक्तींचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. ४ जानेवारीला त्याच घटनास्थळाला लागून असलेल्या जंगलात झुडपामध्ये दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. दोन्हीही बिबट्यांचे पुढच्या पायाचे पंजे शिकाऱ्यांनी चोरून नेले, तर एका बिबट्याचे डोके चोरले आहे. शिवाय मृत नीलगायीचे मांस स्वतः खाण्यासाठी व इतरांना खाण्यासाठी पैशाच्या मोबदल्यात विक्री केले जात असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली. आरोपींनी विद्युत करंट देत रात्रीच्या वेळी शिकार केली. या प्रकरणात झडतीदरम्यान बिबट्याचे दोन पंजे नखांसहित जप्त केले आहेत. आरोपींच्या घरातून झडतीच्या वेळी वन्यप्राण्यांची हाडे, दात, शिंगे व पिंजऱ्यात बंदिस्त केलेला पोपट पक्षीदेखील जप्त करण्यात आला. आरोपींनी भूमराज बोपचे या शेतकऱ्याच्या शेतात बांबूच्या रांझीत वन्यप्राण्यांना करंट लावून मारण्यासाठी वापरलेले साहित्य बासाच्या खुट्यात, सेंट्रिंग तार, केबल व उंच बांबूच्या रांजीत लपवून ठेवले होते. आरोपींची माहिती योग्यवेळी देऊ, असे सांगून वन अधिकाऱ्यांनी ती सांगण्यास टाळाटाळ केली. दोन आरोपींना अटक झाल्याची कबुली मात्र त्यांनी दिली.