गोंदिया: रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर गोंदिया येथील भगतसिंग वॉर्ड येथील एकाच्या घरून १० ते ११ मार्चच्या रात्री दरम्यान दागिने चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विकास उर्फ कालू बलीराम बुराडे (२०) रा.विजयनगर गोंदिया व बबन सुरेश भागडकर (२३) रा. मरारटोली गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते दोन्ही आरोपी ३ एप्रिल रोजी बालाघाट रोड टी पाइटचे जवळील इलेक्ट्रिक पोलजवळ चोरीबाबत आपसात चर्चा करीत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, पोलीस नायक महेश मेहर, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, चालक विनोद गौतम, मुरली पांडे यांनी पेट्रोलिंग करताना, त्या दोघांना पकडले. त्या दोघांना विचारपूस केली असता, त्यांनी विजयनगरातील भगतसिंग वॉर्डच्या एका घराचे कुलूप तोडून गोदरेजच्या आलमारीचा लॉकर तोडून, त्यामधून एक जोड कानातील सोन्याचे झुमके, एक जोड सोन्याची कानझडी, सोन्याची अंगठी, एक सोन्याची नथ, सोन्याची काळी पोत, सोन्याचे नेकलेस, सोन्याचे डोरले, मंगळसूत्र, सोन्याचे रिंग, चांदीची बिछीया, पायल, एक चांदीची कटोरी व चमचा, दोन चांदीच्या नोटा, एक चांदीची गणेश व लक्ष्मीची मूर्ती, एक चांदीचा करंडा, १२ नग चांदीचे शिक्के व ११ हजार रुपये रोख चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे. रामनगर पोलीस ठाण्यात त्या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बॉक्स
ते दागिने नागपूरच्या सोनाराला विकले
गोंदियाच्या थेतसिंग वॉर्ड विजनगरातील एका घरून चोरी करण्यात आलेले लाखो रुपयाचे दागिने आरोपींचा मित्र अमित नंदागवळी रा.वाटोळा, नागपूर याला फोन करुन बोलावले. त्याच्यासोबत मोटारसायकलने नागपूर येथे अमित नंदागवळी याच्या घरी जाऊन त्यास चोरी केलेला माल दिला. अमित नंदागवळी याने स्वतःचे घरी नागपूर येथील सोनाराला बोलावून, सर्व सोन्या-चांदीचे दागिने विक्री केले.