गोंदिया : तालुक्याच्या मुंडीपार येथील तीन बालके बकऱ्या चारण्यासाठी शेतशिवारावर गेले असतांना आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. आंघोळ करण्यासाठी नाल्यात उडी घेतलेल्या १६ वर्षाच्या दोन बालकांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
आर्यन शैलेशकुमार शहारे (१६) व गंगाधर भिवाजी भरणे (१६) दोन्ही रा. मुंडीपार (आसोली) ता. जिल्हा गोंदिया अशी मृय मुलांची नावे आहेत. तीन मुले शेळ्या घेऊन गावलगतच्या नाल्याकडे गेले होते. बकऱ्या चारत असतांना त्यांच्यापैकी मोठा असलेला मुलगा तो बकऱ्यांना आणण्यासाठी काही दूर अंतरावर गेल्याने त्या दोघांना आंघोळीचा मोह आवरला नाही. ते दोघेही आंघोळ करण्यासाठी नाल्याच्या पाण्यात उडी घेतली असता त्या नाल्याच्या बंधाऱ्यावरून ओसंडणाऱ्या पाण्याचा भोवरा तयार झाला परिणामी या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. याचवेळी काही दूर अंतरावर असलेला त्या दोघांपेक्षा मोठा असलेला तिसरा मुलगा धावतच आला. त्याने त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. त्या दोघांचा पाण्यात बुडून यांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक लोकांच्या माध्यमातून त्या दोघांचे मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळापासून २५ फूट अंतरावर त्या दोघांचे मृतदेह वाहून गेले होते. घटनास्थळावर तहसीलदार गोंदिया शमशेर पठाण दाखल झाले. काल व परवा काही प्रमाणात पाऊस आल्याने नाले वाहू लागले होते. या नाल्यात आंघोळ करण्यासाठी उतरलेल्या त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. या घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. तपास ठाणेदार सचिन म्हैत्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.