गोंदिया: रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रिंग रोड लोहिया वॉर्ड येथील योगेश चंद्रकांत ढोमणे (४१) यांच्या घरातून दीड लाखाचे दागिने १४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पळविणाऱ्या नागपूर येथील आरोपीला गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या प्रकरणात पहिला आरोपी मज्जिद करीम खान (२६) रा. बाबाताज कॉलनी, कळमना ता. जि. नागपूर याला कळमना नागपूर येथून ताब्यात घेतले. दुसरा आरोपी राजा ऊर्फ शावेज शकिल खान (४७) रा. इंदिरा माता नगर दुर्गावती चौक नागपूर याला त्याच्या घरूनच अटक केली.
रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रिंग रोड लोहिया वॉर्डातील योगेश चंद्रकांत ढोमणे हे सासुरवाडीला गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून आलमारीतील २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र किंमत ६० हजार, सोन्याचे कानाचे झुमके ४ ग्रॅम वजनाचे किंमत १२ हजार, सोन्याचे कानातील टॉप २ ग्रॅम वजनाचे किंमत ६ हजार, सोन्याच्या ५ नग अंगठ्या वजन १०.५० ग्रॅम वजनाच्या किंमती ३१ हजार ५०० रुपये, सोन्याचे डोरले १ ग्रॅम वजनाचे किमंत ३ हजार, सोन्याचा कडा वजन अर्धा ग्रॅम वजनाचा किंमत दीड हजार, चांदीची वाटी, चांदीचा चम्मच, चांदीचे दोन जोड कड्डे, एक चांदीचे ब्रेसलेट, पायाचे चांदी जोडवे १ जोडी, चांदीचे शिक्के २, चांदीचा कमरेचा आकडा १, चांदीचा करडा १, चांदीचा चाळ २ जोड असे एकूण किंमत १५ हजार तसेच रोख रक्कम ३ हजार असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा माल तसेच योगेश यांच्या आईच्या लोखंडी आलमारीतून १५ हजार रुपये रोख व स्वयंपाक घरातील लोखंडी आलमारीतून १० हजार रुपये रोख असे एकूण २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ५७ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला होता. या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहायक फौजदार कृपाण, पोलिस हवालदार ठाकरे, पोलिस शिपाई रहांगडाले, बंजार यांनी केली आहे. चोरी केलेले दागिने एकाला विक्रीआरोपी मज्जिद करीम खॉन (२६) रा. बाबाताज कॉलनी, कळमना नागपूर व राजा ऊर्फ शावेज शकिल खान (४७) रा. इंदिरा माता नगर दुर्गावती चौक नागपूर यांच्याकडून चौकशी केल्यावर त्या दोघांनी चोरी केलेले दागिने शफिक ऊर्फ बबलू सय्यद अन्सारी (३५)रा. इंदिरा माता नगर दुर्गावती चौक नागपूर याला विकल्याचे सांगितले. परंतु शफिक ऊर्फ बबलू सय्यद अन्सारी हा फरार आहे.