काचेवानी : घरकूल योजनेंतर्गत राज्य शासनकडून देण्यात येणारे २५ टक्क्यांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २१ कोटी रुपयांचे अनुदान अडून पडले असून यात तिरोडा तालुक्यातील घरकूल धारकांचे दोन कोटी रुपये अडले आहेत. परिणामी अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून या प्रकारामुळे घरकूलधारकांत रोष व्याप्त आहे. शासनाच्या रमाई घरकूल व इंदिरा आवास योजनेंतर्गत गरजूंना घरकुलांचा लाभ दिला जातो. यात केंद्र शासनाकडून ७५ टक्के तर राज्य शासनाकडून २५ टक्के अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थ्याला केंद्र व राज्य शासनाकडून ठरवून दिलेल्या अनुदानाच्या स्वरूपात रक्कम दिली जाते. मात्र गेल्या एक वर्षांपासून राज्यशासनाकडून देण्यात येणारे अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे घरकूल धारक कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. या प्रकाराने संबंधित अधिकारी त्रासले आहेत.रमाई योजना आणि इंदिरा आवास योजनेतून घरकूल तयार करण्याचे कार्य जिल्ह्यात सुरु आहे. रमाई योजनेखाली घरकूल तयार करणाऱ्या लाभार्थ्यांना निधी वेळेवर देण्यात येते. मात्र इंदिरा आवास योजनेचा निधी अडवून ठेवण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेची कामे संपूर्ण जिल्ह्यात असून यातील अनुदानाचे २१ कोटी रूपये जिल्ह्यातील अडून आहेत. यात तिरोडा तालुक्यातील दोन कोटी रूपये आहेत. रमाई योजनेंतर्गत सन १२-१३ मध्ये एकूण ६३२ घरकूल व २०१३-१४ करिता १६ घरकुलांची मंजुरी मिळाली होती. ते पूर्णत्वाकडे असल्याची माहिती आहे. यात अनुसूचित जातीचा कोटा संपला असल्याने सन १३-१४ मध्ये मात्र १६ घरकूल मंजूर करण्यात आले होते.इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ करिता ओबीसी, एससी आणि एसटीकरिता एकूण ९१५ घरकूल मंजूर करण्यात आले होते. त्यांची कामे सुरु झाले आहेत. मात्र राज्य शासनाच्या वाट्याला येणारे २५ टक्के अनुदान आतापर्यंत आले नसल्याने घरकुलांची अधिकतर कामे अर्धवट पडून आहेत. घरकूल लाभार्थी निधीकरिता वारंवार कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. परंतु पैसेच नसल्याने त्यांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. इंदिरा आवास योजनेचा निधी अडकल्याने शासनाप्रति नागरिक नाराजी व्यक्त करीत असल्याचे चित्र तालुक्यातील जनतेमध्ये दिसून येत आहे. (वार्ताहर)
इंदिरा आवास योजनेचे दोन कोटी अडून
By admin | Published: January 07, 2016 2:26 AM