गोंदिया : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे मंगळवारी (दि.११) सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. सोमवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असून गेल्या २४ तासात सरासरी २३.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया लगतच्या भंडारा जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. तर कालीसरार धरणाचे दरवाजे सुध्दा रात्रीे उशीरापर्यंत उघडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्यांनी स्वतः ची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा दिला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य असला नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये, शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयात येणारा येवा पाहून विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. कोणत्याही नागरिकास काही अडचण आढळून आल्यास जिल्ह्याच्या खालील दिलेल्या मदतकेंद्र क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविले आहे.
केवळ ६ टक्के रोवण्या पुर्ण
जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने रोवणीच्या कामाला वेग आला नाही. जिल्ह्यात १ लाख ९८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत केवळ ३८ हजार १८६ हेक्टरवर रोवणी झाली असून त्याची टक्केवारी ६.६ टक्के झाली आहे.
दमदार पावसाची प्रतीक्षा कायमजुलै महिना अर्धा संपत आला तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलीे नाही. त्यामुळे रोवणीची कामे पुर्णपणे खोळंबली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.