गोंदिया : एकीकडे शहरातील एकमेव सुभाष बागेत तुटलेल्या क्रिडा साहित्यांची जोडतोड करून त्यांना चालविले जात आहे. दुसरीकडे मात्र शहरातील कृष्णपुरा वॉर्डात सुमारे दोन लाख रूपयांचे क्रीडा साहित्य बेवारस खात्यात पडून असल्याचे चित्र आहे. खुल्या मैदानात बसविण्यात आलेले हे क्रीडा साहित्यकुणीही तोडफोड किंवा चोरून घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने हे क्रीडा साहित्य बसविले असून यातून नगर पालिका किती दानशूर आहे याची प्रचिती येते. कृष्णपुरा वॉर्डात बागेसाठी एक जागा आरक्षित आहे. सध्या ती जागा पडून असल्याने मध्यंतरी येथे पुन्हा बाग फुलवावी असा प्रयत्न केला जात होता. त्यातूनच उघड्यावर पडलेल्या या जागेवर सुरक्षा भिंत व पायवाटचे बांधकाम करण्यात आले. तर सोबतच रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मजारच्या खुल्या जागेवर घसरपट्टी, झुले व सी-सॉ सारखे क्रीडा साहित्य बसविण्यात आले. या परिसरातील चिमुकल्यांच्या खेळण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने हे क्रीडा साहित्य बसविले यात काही वाद नाही. मात्र हे क्रीडा साहित्य बसविण्यात आलेले मैदान मोकळे आहे. सुरक्षा भिंत नसल्याने रस्त्याने ये-जा करताना कुणीही यांची तोडफोड करू शकतो. एवढेच नव्हे तर हे साहित्य चोरीला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने सुमारे दोन लाख रूपयांच्या निधीतून हे क्रीडा साहित्य याठिकाणी बसविले आहे. हे साहित्य बसविण्यात आले त्यावेळी येथील बाग पुन्हा फुलवावी असा विचार केला जात होता. आजघडीला मात्र बागेच्या ठिकाणी लॉन तयार करण्याचा विचार नगर पालिका करीत आहे. अशात येथे लॉन तयार झाल्यास या क्रीडा साहित्यांचा वापरचं काय, असा प्रश्न पडतो. तर दुसरी बाब अशी की, शहरात आजघडीला सुभाष बाग ही एकच बाग अस्तीत्वात आहे. त्यामुळे अख्ख्या शहरातील बच्चेकंपनी येथेच मौजमजा करण्यासाठी येते. असे असतानाही मात्र बागेतील क्रीडा साहित्य जुनाट असून त्यांची तुट-फूट झालेली आहे. घसरण पट्यांना खड्डे पडल्याने तेथून घसरणे चिमुकल्यांच्या अंगलट येत होते. अशात या क्रीडा साहित्यांची जोड-तोड करून त्यांचा वापर केल्याचे चित्र आहे. तर कृष्णपुरा वॉर्डात नगर पालिकेने नवे साहीत्य खरेदी करून बसविले. यातून नगर पालिकेची दानशूरता म्हणावी की नियोजनशून्यता हेच कळेनासे झाले आहे. ज्याठिकाणी ज्या वस्तूंची खरी गरज आहे. त्याक डे दुर्लक्ष करून मात्र भलत्याच ठिकाणी नगर पालिका पैसा खर्ची घालत असल्याचे चित्र आहे. कृष्णपुरा वॉर्डात बसविण्यात आलेल्या साहित्यांचा विरोध नाही. मात्र तेथे या साहित्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसल्याने त्यांची तुटफूट टाळता येणार नाही. यामुळेच दोन लाखांचे क्रीडा साहित्य बेवारस खात्यात पडून असल्याचे हे चित्र बघून बोलणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी)
दोन लाखांचे क्रीडा साहित्य बेवारस खात्यात
By admin | Published: June 29, 2014 11:57 PM