देवरी -आमगाव मार्गावरील वडेगाव शिवाराजवळ बिसेन यांची राईस मिल आहे. या राईस मिलला लागून जंगल परिसर आहे. या जंगलात दोन बिबट गावकऱ्यांना सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतावस्थेत आढळले. दरम्यान या प्रकाराची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली. वडेगाव येथील काही गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रात्री ९:३० वाजताच्या सुमारास गावकऱ्यांना दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दोन्ही बिबट्यांची शिकार विद्युत करंट लावून शिकारीच्या दृष्टीेने केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सुध्दा या घटनेला दुजाेरा दिला. विशेष मागील काही महिन्यापासून देवरी व सालेकसा परिसरातील जंगलात शिकाऱ्यांची टोळी सक्रीय असल्याची चर्चा आहे. दरम्यान वडेगाव येथील जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या दोन बिबट्यांची शिकार ही विद्युत करंट लावून करण्यात आली असून या मागे शिकारीचा उद्देश असल्याचा संशय असल्याचे मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.