बाराभाटी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव परिरात मागील सहा दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. हे दोन्ही बिबट रात्रीच्या वेळेस गावात प्रवेश करुन गोठ्यात बांधलेली जनावरे आणि कोंबड्या बकऱ्यांना आपले भक्ष्य केले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने दखल घेऊन बिबट्यांना जंगलाच्या दिशेने परतावून लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
सुरगाव हा जंगलव्याप्त परिसर आहे. हे गाव लहान असून मागील सहा दिवसांपासून दोन बिबट्यांनी या भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हे दोन्ही बिबटे कोंबड्या, बकऱ्या आणि गोठ्यात बांधलेल्या जनावरांना आपले लक्ष करीत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पंचनामा करुन बिबट्यांवर पाळत ठेवण्यासाठी गावात दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. मात्र मागील सहा दिवसांपासून या दोन्ही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
.....
कोट
आमच्या गोठ्यातील गोऱ्हा बिबट्याने मारला आहे. सहा दिवस झाले बिबट नियमित गावात येत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. मात्र ही बाब अजूनही वनविभागाने गांभीर्याने घेतलेली नाही.
- वसंत मेश्राम, नागरिक सुरगाव
--------------
गावातील आणि आमच्या कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
- देवदास शेंडे, नागरिक सुरगाव
-------------
वनविभागाची चमू येतच नाही
गावात मागील सहा दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती वनविभागाला आहे. पण यानंतरही वनविभागाची चमू गावात नियमित येत नाही. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.