देवानंद शहारे ल्ल गोंदियानवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांना एप्रिल व मे २०१६ या दोन महिन्यांत एकूण १२ हजार ७७० पर्यटकांनी भेटी दिल्यात. त्याद्वारे वन्यजीव विभागाला तब्बल ९ लाख ९१ हजार ३८५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पांतर्गत नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य, नवेगाव अभयारण्य व कोका अभयारण्याचा समावेश आहे. यात एप्रिल महिन्यात १२ वर्षांखालील ३१२ व १२ वर्षांवरील चार हजार २२१ तसेच आठ विदेशी पर्यटक मिळून एकूण चार हजार ४४१ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यांच्याकडून दोन लाख आठ हजार ३०५ रूपये वसूल करण्यात आले. जड व हलके वाहन मिळून एकूण ८९० वाहनांचा वापर करण्यात आला. या वाहनांकडून एकूण एक लाख ३६ हजार १०० रूपये प्रवेश शुल्क घेण्यात आले. तसेच ३५८ कॅमेऱ्यांच्या उपयोगातून ३२ हजार १५० रूपये प्राप्त झाले. अशाप्रकारे एप्रिल महिन्यात एकूण तीन लाख ७६ हजार ५५५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. तसेच मे महिन्यात १२ वर्षांखालील ७७२ व १२ वर्षांवरील सात हजार ४५७ अशा एकूण आठ हजार २२९ पर्यटकांनी व्याघ्र राखीव क्षेत्राला भेटी दिल्यात. त्यांच्याकडून तीन लाख ६९ हजार ९३० रूपये वसूल करण्यात आले. हलके व जड वाहन मिळून एकूण एक हजार ४८० वाहनांचा उपयोग करण्यात आला. वाहन प्रवेश शुल्काची एकूण रक्कम दोन लाख १० हजार ९०० रूपये गोळा झाले. तर ३३९ कॅमेऱ्यांच्या वापरातून ३४ हजार ८०० रूपये प्राप्त झाले. अशा प्रकारे मे महिन्यांत सहा लाख १४ हजार ८३० रूपयांचा महसूल गोळा झाला. नवेगाव अभयारण्याला सर्वात कमी पर्यटकांनी भेटी दिल्याची नोंद वन्यजीव विभागाने केली आहे. एप्रिल महिन्यात १२ तर मे महिन्यात केवळ १० पर्यटकांनी येथे भेटी दिल्या आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत कमी पर्यटकांच्या भेटी४सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या (१ एप्रिल ते ३१ मार्च) तुलनेत सन २०१५-१६ मध्ये व्याघ्र राखीव क्षेत्राला कमी पर्यटकांनी भेटी दिल्याचे सदर विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिसून येते. सन २०१४-१५ मध्ये पर्यटक संख्या ३२ हजार ८६ व त्यांच्याकडून मिळालेले प्रवेश शुल्क ११ लाख १८ हजार ७९२ रूपये, वाहन संख्या ५ हजार ३३९ व वाहन प्रवेश शुल्क ५ लाख ८३ हजार ४४५ रूपये, कॅमेरा शुल्क १ लाख ८४ हजार ८३२ रूपये असा एकूण १८ लाख ८७ हजार ०६९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर सन २०१५-१६ मध्ये पर्यटकांची संख्या ४ हजार ९०१ व त्यांचाकडून मिळालेला प्रवेश शुल्क २ लाख २९ हजार ४१५ रूपये, वाहन संख्या ९८२ व वाहन प्रवेश शुल्क १ लाख ४१ हजार ७०० रूपये, कॅमेरा शुल्क ३५ हजार ७५० असा एकूण ४ लाख ०६ हजार ८६५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. पर्यटकांनी आॅनलाईन बुकींग १५ जूननंतर बंद करण्यात आली आहे. परंतु सध्या पाऊस पडत नसल्याने आॅफलाईन बुकींग ३० जूनपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. या वाढीव कालावधीचा पर्यटक लाभ घेवू शकतात. मात्र चांगला पाऊस बरसला तर तेव्हापासून आॅफलाईन बुकींगसुद्धा बंद करण्यात येईल.-एस.एस. कातोरे,विभागीय वनाधिकारी (वन्यजीव), गोंदिया
दोन महिन्यांत पर्यटनातून ९.९१ लाखांचे उत्पन्न
By admin | Published: June 23, 2016 1:22 AM