गोंदिया : आर्थिक वर्ष सरायला आता २८ दिवसाचा कालावधी उरला असून, यामुळे कर वसुली पथक पुन्हा ॲक्टिव्ह झाले असून, मंगळवारी (दि.२) थकबाकी न भरणाऱ्या दोन घरांना सील ठोकण्यात आले आहे. शिवाय चार मालमत्ताधारकांना एक दिवसाचे अधिपत्र बजावण्यात आले आहे.
कर वसुलीसाठी आता पथकाकडे २८ दिवसाचा कालावधी असून, या कालावधीत जेवढी जास्त वसुली होणार तेवढाच त्रास पुढील वर्षी कमी होणार, यंदा एक नवे कीर्तीमान कर विभाग करणार आहे. यामुळेच मंगळवारी (दि.२) कर वसुली पथक पुन्हा मैदानात उतरले व त्यांनी शहरातील सुखदेव वॉर्ड क्रमांक-२२ मधील शेवंता बडोले यांच्या घरी धडक दिली. त्यांच्यावर सन २०१२-१३ पासून ५१ हजार ३०१ रुपयाची दोन्ही घरांची थकबाकी असूनही त्यांनी थकबाकी भरण्यास नकार दिला. यावर पथकाने त्यांच्या दोन्ही घरांना सील ठोकले.
तर त्यानंतर कुलशुनाबी अहमद शेख यांच्यावर सन २००३ पासून ८४ हजार ९७७ हजार रुपये, हिराबेन चावडा यांच्यावर सन २००३-०४ पासून एक लाख ३९ हजार ११७ रुपयाची थकबाकी, गेंदाबाई ठाकूर, झामसिंग क्षत्रीय व झामसिंग ठाकूर यांच्यावर सन २०१३ पासून ९४ हजार १०३ रुपयाची थकबाकी तर रतनदास कोडवानी यांच्यावर सन २०१२-१३ पासून ४३ हजार ३२१ रुपयाची थकबाकी असल्याने त्यांना एक दिवसाचे अधिपत्र बजावण्यात आले आहे.