कपिल केकत, गोंदिया : शहरासह लगतच्या राज्यांत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ११) पकडले आहे. पथकाने त्या दोघांकडून विविध ठिकाणांहून चोरून आणलेल्या चार लाख ७० हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मोटारसायकल चोरी व घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशात पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांना जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरी व मालमत्ताविषयक गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार लबडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी-अंमलदारांना याबाबत सूचना दिल्या होत्या. यावर पथक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच सोमवारी (दि. ११) पथक गस्तीवर असताना त्यांना आकाश कमलाकर पवार (२७, रा. हनुमान गल्ली, लक्ष्मीनगर) याच्याकडे चोरीची मोटारसायकल असल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने आकाश पवार याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने अजय श्रीराम तेलंग (३२, रा. गौतमनगर, बाजपेयी वॉर्ड) याच्यासोबत मिळून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. यावर पथकाने अजय तेलंग याला ताब्यात घेऊन दोघांची विचारपूस केली असता त्यांनी गोंदियासह मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याकडून चार लाख ७० हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकल पथकाने जप्त केल्या. ही कामगिरी लबडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, सहायक फौजदार अर्जुन कावळे, हवालदार इंद्रजित बिसेन, राजू मिश्रा, भुवन देशमुख, सोमेंद्र तूरकर, रियाज शेख, महेश मेहर, नेवालाल भेलावे, कोडापे, सुजीत हलमारे, लक्ष्मण बंजार, संतोष केदार यांनी बजावली आहे.
आरोपींना केले शहर पोलिसांच्या सुपुर्द :
आरोपी आकाश पवार व अजय तेलंग यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या आठ मोटारसायकलमधील एक मोटारसायकल शहर पोलिस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्यातील आहे. यामुळे पथकाने दोघांना जप्त केलेल्या मोटारसायकलसह शहर पोलिसांच्या सुपुर्द केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास शहर पोलिस करीत आहेत.