तिरोडा ठाण्यातील पोलीस : अवैध वसुलीचा नाद पोलिसांच्या अंगलटगोंदिया : पोलीस विभागातील काही कर्मचारी किरकोळ घटनेतील किंवा इतर प्रकरणात मलई मिळावी म्हणून संबंधितांना आमिष दाखवून गुन्ह्याचे स्वरुप शिथील करण्याची हमी देत अवैध व्यवसाय करणाऱ्याकडून हफ्ता वसूली करण्यात येते. ही बाब लक्षात येताच तिरोडा पोलीस ठाण्यातील दोन वसुलीबहाद्दर पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांनी १६ फेब्रुवारी रोजी निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये नापोशि ग्यानीराम करंजेकर (ब.नं.११५४) व नापोशि निलेश बावणे (ब. नं. ३२६ ) यांचा समावेश आहे. दरम्यान दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबन कालावधीमध्ये महाराष्ट्र नागरीसेवा नियम १९८१ मधील नियम ६८ अन्वये तसेच १९७९ मधील नियम १६ अन्वये गैरवर्तणुक शिस्तभंग कारवाईस पात्र ठरविण्याचे आदेश बजाविण्यात आले आहे.तिरोडा पोलीस ठाण्यात नापोशि ग्यानीराम करंजेकर (ब.नं.११५४) व नापोशि निलेश बावणे (ब.नं.१३२६) हे दोघेजण कार्यरत होते. पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रारीवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. लाचखोर प्रवृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत.विशेष म्हणजे भ्रष्टाचारावर अंकुश लागावा व भ्रष्टाचाराचे समोर उच्चाटण व्हावे यासाठी पोलीस विभागावरच कारवाईची जबाबदारी असते. परंतु पोलीस विभागालाच भ्रष्टाचाराची किड लागल्याची बाब या घटनेने समोर आली आहे. यामुळे इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कुणाचे आदर्श जोपासावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील गैरव्यवहार प्रवृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेवून त्यांना वटणीवर आणण्याचे कारवाई करावी लागणार आहे. निलंबनाच्या काळात या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. त्यांनी धंदा केल्यास त्यांच्यावर १९७९ मधील नियम १६ अन्वये गैरवर्तणुक समजले जाईल. या कृतीमुळे ते निर्वाह भत्ता सुधञदा गमावतील. आमगाव येथे असतांना नितेश बावने खिशे गरम करणाऱ्या कर्मचाऱ्यांत अव्वल होते. तत्कालीन ठाणेदाराच्या आशिर्वादाने त्यांनी जमविलेल्या संपत्तीची चौकशी केल्यास या कर्मचाऱ्याच्या लाचखोरीची सत्यता पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना कळेल.
खिसे गरम करणारे दोन पोलीस निलंबित
By admin | Published: February 26, 2016 1:59 AM